भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर कमी आहेत असे म्हणतात. पण लॉकडाऊनच्या कृपेने हा प्रश्न सुटला आहे. घरोघरी डॉक्टर्सचा सुळसुळाट झाला आहे. कुटुंबात चार माणसे असतील तर दिवसाला किमान आठ डॉक्टर्स घरपोच येतात. कारण कुटुंबातली चारी माणसे आपापल्या व्हॉट्सअप विद्यापीठात वावरत असतात. तिथून दिवसाला किमान दोन डॉक्टर्स आपले रामबाण उपाय घेऊन अवतरतात. कोणी आर्सेनिक आल्बमचे डोस घ्यायला सांगतो, कोणी गोमूत्रापासून लवकरच नवे औषध येणार असल्याची सुवार्ता कानी घालतो, कोणाचा
हायड्रोक्सी क्लोरोक्वीनवर विश्वास असतो तर कोणाची अश्वगंधारिष्टावर श्रद्धा असते.
लॉकडाऊनमुळे सगळे कुटुंब आपापल्या घरात नजरकैद झाले आहे. ज्याने त्याने जसा मिळाला तसा किराणा माल घरात भरून ठेवला आहे. त्यातले घटक उचलून त्यातून जे पदार्थ रांधणे शक्मय आहे ते रांधले जातात आणि खाल्ले जातात. कोणे एके काळी घरे सामानांनी, खिसे पैशांनी किंवा डेबिट-पेडिट कार्डे शिलकांनी भरलेली होती तेव्हा रांधण्याचे शेकडो पर्याय होते. एखादा पदार्थ बाहेरून मागवता येत असे. किंवा ते नको असेल तर बाहेर जाऊन खाण्यासाठी अनंत वाटा होत्या. ‘खायला काय करू?’ हा तेव्हा यक्षप्रश्न किंवा भक्ष्यप्रश्न नव्हता. आता ही गंमत सरली आहे. घरात जे रांधले जाईल ते निमूट खाल्ले जाते. अशा वेळी टीव्हीवर रोज बटाटेवडे खाणारा नट किंवा गाणे गात गात सामोसे तळणारी भगिनी दिसली की तळपायाची आग मस्तकाला जाऊ शकते. आमचा एक मित्र स्थितप्रज्ञ वृत्तीचा आहे. देशोदेशीचे पर्यटन आणि हॉटेल्स दाखवणारी एक विदेशी वाहिनी टीव्हीवर उपलब्ध आहे. त्यावर चोवीस तास सतत चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेणारी माणसे दिसत असतात. आमचा मित्र न्याहारीची प्लेट किंवा जेवणाचे ताट घेतले की ही वाहिनी लावतो आणि समोरच्या पदार्थांकडे बघत समोरचे खरे पदार्थ निमूट खातो. खाताना आपण पडद्यावरचे पदार्थ खात असल्याची कल्पना करतो. दुसरं काय करील बिचारा.
द वेन्सडे सिनेमात अतिरेक्मयांना सोडण्याचा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा पोलीस मुख्यमंत्र्यांकडे कुरकुर करतो. मुख्यमंत्री रागाने विचारतात, आपल्याकडे अन्य पर्याय आहेत का? पोलीस गप्प बसतो. हल्ली एखादा पदार्थ आवडला नाही तर नवरा-बायको एकमेकांकडे बघून मनातल्या मनात मुख्यमंत्र्यांप्रमाणे विचारतात, आपल्याकडे अन्य पर्याय आहेत का?
आणि दोघे निमूटपणे जेवू लागतात.








