आरोग्य विभाग-महापालिकेकडून तपासणी : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, क्वारंटाईन नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्णांची रवानगी रुग्णालयात करणे, संशयित किंवा कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करणे आदी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. मात्र, घरोघरी जावून नागरिकांची थर्मल चाचणी घेणे आणि क्वारंटाईन असल्यास किंवा कोरोनाबाधित असल्यास स्टिकर लावण्याचे काम आरोग्य विभाग आणि महापालिकेकडून सुरू ठेवण्यात आले आहे.
मागील वषी कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर नियंत्रणासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. परराज्यांतून शहरात येणाऱया नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर होती. परराज्यांतून येणाऱया नागरिकांची कोरोना चाचणी करून तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात येत होते. कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत होते. कोरोना बाधितांच्या घराला कंटेन्मेंट करण्यात येत होते. परिणामी कोरोना रुग्णांवर प्रशासनाची नजर असल्याने कोरोनाच्या प्रसाराला ब्रेक लागला होता. क्वारंटाईन करण्याच्या प्रक्रियेमुळे प्रसार रोखण्यात शासनाला यश आले होते. पण कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून नागरिक शहरात वावरू लागले.
संशयित असल्यास लावले जातेय स्टिकर
यंदा कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असून सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या सपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली आहे. कंटेन्मेंट करण्याचे थांबविण्यात आल्याने कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळत नाही. कोरोनाबाधितांना घरीच उपचार देण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अशा स्थितीतही घरोघरी जावून माहिती घेण्याची मोहीम महापालिका आणि आरोग्य खात्याने सुरू ठेवली आहे. क्वारंटाईन नागरिकांची माहिती घेण्यासह घरात औषधोपचार घेत असलेल्या नागरिकांची व सदस्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. कोरोनाबाधित किंवा संशयित असल्यास स्टिकर लावण्यात येत आहेत. घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहीम महापालिका आणि आरोग्य खात्याच्यावतीने सुरू ठेवण्यात आली आहे.









