चेतेश्वर पुजाराचे प्रतिपादन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरुन क्रीडापटूंची मोहीम सुरु
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रदीर्घ काळ फलंदाजी करत राहणे, खेळपट्टीवर ठाण मांडून राहणे हा चेतेश्वर पुजाराचा फलंदाजीतील स्वभाव. तीच अपेक्षा त्याने भारतीयांकडून व्यक्त केली आहे. ‘आपण घरी थांबत असाल तरच तुम्ही देशासाठी ही लढाई लढत आहात’, असे पुजारा म्हणाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील अव्वल क्रीडापटूंशी व्हीडिओ कॉलद्वारे संपर्क साधला आणि जनजागृतीचे आवाहन केले. त्याला अनुसरुन सर्वप्रथम पुजाराने पुढाकार घेत नागरिकांना घरी थांबून ही लढाई लढण्याचे आवाहन केले. भारतात सध्या या प्रकोपाविरुद्ध लढण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे.
‘आपल्यातील लढवय्या प्रवृत्ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आणि क्रीडापटूंनी ते प्राधान्याने करायला हवे. सध्याच्या घडीला बरेच जण प्रशासनाची मार्गदर्शक तत्वे पाळत आहेत. पण, अद्याप बरेच काही जण ही गंभीर परिस्थिती हलकेपणाने घेत आहेत. आपल्याला देखील या विषाणूमुळे त्रास होऊ शकतो, हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. आताची वेळ अशी आहे की, प्रत्येक व्यक्ती योद्धा आहे. तुम्ही जर घरीच थांबून असाल तरच तुम्ही ही लढाई लढत आहात. आपल्याला एकत्रित प्रयत्नांवर भर द्यावा लागेल. तसे झाले तरच आपण ही लढाई जिंकू शकू’, असे पुजारा पुढे म्हणाला.
मागील महिन्यात सौराष्ट्राला प्रथमच रणजी स्पर्धा जिंकून दिल्यानंतर हा दिग्गज खेळाडू सध्या सक्तीच्या विश्रांतीसह घरी आहे. दोन वर्षांच्या कन्येशी खेळणे, हा त्याचा प्राधान्यक्रम आहे. तिच्याशी प्लॅस्टिक बॅटने खेळणे इतक्यापुरताच त्याचा सध्या क्रिकेटशी संबंध आहे. पण, घरीच असलेल्या जिममुळे तंदुरुस्तीकडे तो विशेष लक्ष पुरवू शकतो आहे.
‘मी प्रत्येक बाब सकारात्मकतेने घेतो. काही वेळा खेळाडू या नात्याने विश्रांती घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. आम्ही नुकतीच रणजी स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर तीन-चार आठवडय़ांची विश्रांती मिळणे स्वागतार्ह आहे. सुदैवाने माझ्याकडे घरीच जिम आहे. मी योगा करतो आणि त्याचेही मला लाभ जाणवत आले आहेत’, असे त्याने याप्रसंगी सांगितले.
कौंटी क्रिकेटही लांबणीवर
चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळणार होता. पण, कोव्हिड-19 चा फटका या स्पर्धेला देखील बसला असून तूर्तास दि. 28 मेपर्यंत ती लांबणीवर टाकली गेली आहे. नंतर ही स्पर्धा रद्द देखील केली जाऊ शकते.
सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता, पुजाराला पुढील व्यावसायिक लढत खेळण्यासाठी अगदी नोव्हेंबरमध्ये आयोजित ऑस्ट्रेलिया दौऱयापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
सध्या क्रिकेटचा विचार नाही
सध्याच्या घडीला मी क्रिकेट सामन्यांचा विचार अजिबात करत नाही. कोरोनाला हरवणे, हे आपल्या सर्वांचे पहिले लक्ष्य असायला हवे, असे त्याने याप्रसंगी सांगितले. 2018-19 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत धूळ चारली, त्यावेळी पुजारा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्या कसोटी मालिकेत पुजाराने 74.42 च्या सरासरीने 521 धावांची आतषबाजी केली होती. यात तीन शतकांचा समावेश होता. त्या आठवणीला पुजाराने उजाळा दिला. पण, याचवेळी मागील पराक्रमाचा पुढील मालिकेत काहीही उपयोग होणार नाही, प्रत्येक मालिकेत नव्यानेच सुरुवात करावी लागेल, असेही तो आवर्जून म्हणाला.









