आडपई येथील दुर्घटना
प्रतिनिधी / फोंडा
खुमणेभाट आडपई येथील आगीच्या दुर्घटनेत सर्वेश आडपईकर व चंद्रशेखर नाईक यांचे राहते घर पूर्णपणे बेचिराख झाले आहे. रविवारी रात्री लागलेल्या या भीषण आगीत दोन्ही कुटुंबियांची मिळून साधारण रु. 25 लाखांची हानी झाली आहे. फोंडा अग्नीशामक दलाचे स्टेशन अधिकारी सुशिल मोरजकर यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी पंचनामा करुन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी विभागीय अधिकारी राजेंद्र हळदणकर हे उपस्थित होते.
वॉशिंगमशीनच्या ठिकाणी शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वेश आडपईकर व चंद्रशेखर नाईक हे चुलत भाऊ आपल्या कुटुंबासह एकाच घरात वेगवेगळे राहत आहेत. रविवारी रात्री 8.30 वा. सुमारास ही आग लागली, तेव्हा घरातील सर्व मंडळी बाहेर होती. घर जुन्या पद्धतीचे लाकडी माडी असलेले व कौलारु छप्पराचे असल्याने आंतमधील सामान व छप्पराने लगेच पेट घेतला. घरातील मंडळी व शेजाऱयांच्या ही घटना लक्षात येईपर्यंत आग आटोक्याबाहेर पोचली होती. घराचे लाकडी छप्पर, आंतमधील फर्निचर यासह बहुतेक सामान या आगीत पूर्णपणे जळून गेले आहे. कपाटातील सोनेनाणे व कपडेही जळाले आहेत. भिंतीलाही मोठय़ा प्रमाणात तडे गेले आहेत. त्यात सर्वेश यांचे साधारण रु. 10 लाखांचे तर चंद्रशेखर यांच्या पुटुंबाचे रु. 15 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्नीशामक दलाकडून मिळाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी फोंडा अग्नीशामक दलला दोन बंबांचा वापर करावा लागला.









