पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे वास्तव्यास असणाऱया दीपनारायण नायक यांनी पश्चिम वर्धमान जिल्हय़ातील 12 गावांमध्ये एक अनोखा प्रयोग सुरू केला आहे. या गावातील घरांच्या भिंतींचे रुपांतर त्यांनी शाळेत उपयोगात आणल्या जाणाऱया फळांमध्ये केले आहे. याच फळय़ांवर आता या गावांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. तसेच त्यांचे पालकही विद्याभ्यास करीत आहेत. याशिवाय हे फळे गावकऱयांच्या चित्रकलेलाही प्रोत्साहन देत आहेत.
कोरोना काळात या गावांमधील शाळा बंद झाल्या होत्या. अनेक शाळा अद्यापही बंदच आहेत. अशावेळी मुलांना घरातच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यांच्या शिक्षणासाठी ही भिंतींचे फळे करण्याची कल्पना दीपनारायण नायक यांना सूचली. त्यांनी प्रथम एका गावात प्रयोग केला. तो यशस्वी ठरल्याने अन्य 11 गावांमध्येही त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. आता त्यांच्या या अभिनव शिक्षण उपक्रमाला अनेकांनी पाठिंबा दिला असून आर्थिक साहाय्यही केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वहय़ा व इतर शिक्षण साहित्य पुरविणे त्यांना शक्य होत आहे.
35 वर्षांचे दीपनारायण नायक यांनी फार्मसी विषयात पदवी घेतली असून बीएड् केले आहे. अनेक वर्षे त्यांनी औषधी निर्मिती क्षेत्रात काम केले. तसेच रुग्णालयांमध्येही सेवा केली. त्यानंतर आता ते शिक्षण कार्याशी जोडले गेले आहेत. आसनसोल जिल्हय़ातील पुष्कळशी लोकसंख्या वनवासी आहे. मुळातच या भागांमध्ये शाळांची वानवा आहे. त्यात कोरोनामुळे असलेल्या शाळाही बंद पडल्या. मुलांच्या शिक्षणांचे आबाळ होऊ लागले. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले. त्यांच्या या कार्याची दखल युनिसेफनेही घेतली असून त्यांची प्रशंसा केली आहे.









