अन्य एक पसार, घरफोडय़ांचे गुन्हे उघडकीस येणार : संशयित प्रकाश पाटील पर्ये-गोवा येथील
प्रतिनिधी / दोडामार्ग:
सातत्याने सुरू असणाऱया घरफोडय़ांमुळे सिंधुदुर्गची पोलीस यंत्रणा हतबल झाली होती. या पार्श्वभूमीवर घरफोडी टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याजवळ पिस्तुलासह घरफोडीचे सामान मिळाले आहे. प्रकाश विनायक पाटील (30, रा. झरीवाडा, पर्ये-सत्तरी गोवा) असे त्याचे नाव असून त्याचा सहकारी पसार आहे. पाटील याला दोडामार्ग न्यायालयात हजर केले असता न्या. स्वाती पन्हाळे यांनी त्याला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याबाबतचा तपास सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभाग करत आहे.
याबाबतची माहिती अशी की, संशयित प्रकाश पाटील याला दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथे पोलिसांनी सापळा रचून मोठय़ा शिताफीने 29 जानेवारीला ताब्यात घेतले. संशयित पोलिसांच्या हाती लागला तरी त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. पाटील याच्याकडे पिस्तुल, चार राऊंड तसेच घरफोडी करण्याच्या साहित्यातील कटावणी, स्पू ड्रायव्हर, हॅण्ड ग्लोज, मास्क आदी साहित्य सापडले आहे.
सिंधुदुर्गातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार
संशयित पाटील हा गोव्यात राहत असला तरी यापूर्वी घरफोडी प्रकरणात त्याच्यावर गोव्यासह सिंधुदुर्गातील दोडामार्ग, कुडाळ तसेच कर्नाटक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांच्या हाती म्होरक्या लागला असून त्यामुळे सिंधुदुर्गातील घरफोडय़ांचे कनेक्शन समोर येणार आहे.
संशयित पाटील याच्याकडे पिस्तुलसह चार राऊंड आढळल्याने ते कोठून आणले, तसेच अन्य एका संशयिताचा शोध आणि सिंधुदुर्गातील अनेक घरफोडी यांच्याशी संशयितांचे कनेक्शन या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
सावंतवाडीतील चोरीची कबुली
दरम्यान, सावंतवाडी शहरात भरवस्तीत आठ दिवसांपूर्वी झालेल्या बंगला व एका फ्लॅटमधील चोरीप्रकरणी पाटील याची चौकशी सुरू आहे. शुक्रवारी त्याला चौकशीसाठी पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. त्याने चोरीची कबुली दिली आहे. सावंतवाडी-खासकीलवाडा जेलमागील भरत गवस यांचा बंगला व महालक्ष्मी कॉम्प्लेक्समधील आनंद देसाई यांचा फ्लॅट फोडून साडेआठ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरटय़ाने लंपास केली होती. तसेच दुसऱया दिवशी चराठे-खरवतकर टेंब येथेही चोरीची घटना उघडकीस आली होती.
या चोरीचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करत होते. अवघ्या पाच दिवसात संशयित पाटील याला ताब्यात घेण्यात आले. सावंतवाडीत झालेल्या तीन चोरीप्रकरणी त्याला घटनास्थळी चौकशीसाठी आणण्यात आले होते. सावंतवाडीतील चोरी प्रकरणातील मुद्देमाल कुठे ठेवला, याची माहिती पोलीस घेत आहेत.









