बेनकनहळ्ळी-हिंडलगा मार्गावरील स्वराज्य कॉलनीत घटना
प्रतिनिधी / बेळगाव
मळेकरणीसाठी कुटुंबिय उचगावला गेले असताना चोरटय़ांनी संधीचा फायदा घेत बंद घर फोडून आठ तोळे सोन्याचे दागिने, रोख 85 हजार रुपये तसेच त्यांच्या मुलाने जमा केलेले 15 हजार रुपये असा सुमारे पाच लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी बेनकनहळ्ळी-हिंडलगा मार्गावरील स्वराज्य कॉलनी येथे उघडकीस आली.
निवृत्त जवानाच्या घरी ही चोरी झाली असून या घटनेमुळे बेनकनहळ्ळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
माजी सैनिक उमेश आपटेकर यांच्या घरी ही चोरी झाली आहे. मळेकरणीसाठी कुटुंबीय घराला कुलूप लावून गेले होते. चोरटय़ांनी पाळत ठेवून घराच्या मागील बाजूला असलेला दरवाजा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील
दोन तोळय़ाचा नेक्लेस, दीड तोळय़ाच्या दोन अंगठय़ा, एक तोळय़ाची कर्णफुले, दीड व दोन तोळय़ाच्या दोन चेन चोरटय़ांनी लांबविल्या आहेत. कपाटात ठेवलेले 85 हजार रुपये तसेच मुलाने जमा केलेले 15 हजार रुपये देखील चोरटय़ांनी चोरुन नेले आहेत. दुपारी 1 ते 4 दरम्यान ही चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तातडीने या घटनेची माहिती काकती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून करुन पंचनामा केला. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे.









