प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील धामणदेवी येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी येथील पोलिसांनी हस्तगत केलेले ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशानुसार इब्राहिम अब्दुला फिरफिरे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आले. १६ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या घरफोडीनंतर पोलिसांनी तिघांना जेरबंद केले होते.
धामणदेवी येथील इब्राहिम फिरफिरे यांचे अज्ञात चोरट्यांनी घरफोडून ३ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला होता. घरी परतल्यानंतर दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी गोपनीय खबऱ्यांकडून चोरट्यांच्या ठावठिकाणाबाबत माहिती प्राप्त करत अजिंक्य मोहिते, दीपक लिल्हारे, सैफ काझी या तिघांना गजाआड केले होते.
घरफोडीप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतरही चोरलेल्या दागिन्यांबाबत चोरटे काहीच माहिती देत नव्हते. अखेर पोलीस उपनिरीक्षक सोमनाब कदम यांनी गुन्ह्याचा शास्त्रीय व तांत्रिक तपास केला. घरफोडीनंतर चोरट्यांनी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे काही दिवस वास्तव केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. यादरम्यान, चोरट्यांनी सोन्याचे दागिने डोंबिवली येथील एका सराफाकडे तारण ठेवल्याचे व काही दागिने मित्राकडे ठेवल्याची कबुली दिली होती.
डोंबिवलीतील पोलिसांच्या मदतीने येथील पोलिसांनी सराफासह चोरट्यांच्या मित्राचा शोध घेत घरफोडीतील ३ लाखांचे दागिने हस्तगत केले होते. घरफोडीतील सोन्याचे दागिने फिर्यादी इब्राहिम फिरफिरे यांच्या सुपूर्द करावेत, असे आदेश येथील न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या हस्ते हस्तगत केलेले सर्व दागिने फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले.








