संजीव खाडे / कोल्हापूर
यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना कोल्हापूर महापालिकेकडे शहरातील मिळकतींचा केवळ पन्नास टक्के घरफाळा जमा झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेने आता उत्पन्नवाढीसाठी वसुली मोहीम तीव्र केली आहे. घरफाळा भरल्याशिवाय महापालिकेतून दिल्या जाणाऱया कोणत्याही परवानगी (मंजुरी) अथवा जन्म, मृत्युच्या दाखल्यासह इतर दाखले संबंधित मिळकतधारकांना मिळणार नाहीत. अशा प्रकारचा नवा नियम महापालिकेच्या प्रशासनाने केला असून नागरी सुविधा केंद्रासह संबंधित विभागांना या संदर्भातील पत्रही पाठविण्यात आले आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाच्या स्त्राsतामध्ये घरफाळÎाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न सर्वाधिक असते. त्यामुळे दरवर्षी या घरफाळा विभागाला उत्पन्न वसुलीचे वाढीव उद्दीष्टही दिले जाते. 2020- 2021 या आर्थिक वर्षात घरफाळा विभागापुढे 78 कोटी रूपयांचे वसुलीचे उद्दीष्ट आहे. पण कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक स्थितीचा परिणाम वसुलीवर झाला. त्यानंतर आर्थिक चक्र सावरत असले तरी अजूनही महापालिकेला घरफाळा वसुलीत अपेक्षित यश मिळालेले नाही. सध्या डिसेंबर महिन्याचे दुसरा आठवडा पूर्ण होत आला. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ साडेतीन महिन्यांचा कालावधी आहे. अशा स्थितीत केवळ 40 कोटी रूपयांचा घरफाळा वसूल झाला आहे. त्यामुळे 38 कोटींचा थकीत घरफाळा वसुल करण्याचे आव्हान घरफाळा विभागापुढे आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी महापालिकेला असणाऱया प्रशासकीय आणि कार्यालयीन अधिकारानुसार घरफाळा वसुली करण्यासाठी नवी शक्कल लढविताना घरफाळा भरल्याशिवाय कोणताही दाखला अथवा परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. औंधकर यांनी याआधी अक्कलकोट, आळंदी, कराड येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. तेथेही घरफाळा वसुलीसाठी त्यांनी अशाच प्रकारचा नियम केला होता. तीच पद्धत त्यांनी कोल्हापूरसाठी अवलंबिली आहे.
घरफाळा भरला असेल तरच मिळणार परवानगी आणि दाखले
महापालिका नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देते. त्या बदल्यात घरफाळÎाच्या रूपाने कर वसुलीचा अधिकार महाराष्ट्र महापालिकेला कायद्याने आहे. या कायद्याचा वापर करून घरफाळा वसुली केली जाते. पण गेल्या काही वर्षांपासून घरफाळा थकविण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच कोरोनामुळे गतवर्षीच्या तुलनेत थकीत घरफाळÎाचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत आर्थिक स्थिती बिघडलेल्या महापालिकेपुढे उत्पन्नवाढीसाठी घरफाळा वसुली तीव्र करण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी परवानगी आणि दाखले देण्यासंदर्भात घरफाळा भरणे सक्तीचे करण्याचा नियम अंमलात आणण्याचे नियोजन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी केले आहे. त्यानुसार परवाना विभाग, नगररचना विभाग, पाणी पुरवठा विभाग या विभागांसह इतर ज्या विभागातून नागरिकांना विविध परवानगी अथवा मंजुरी आवश्यक असतात. त्या देताना त्याने आपल्या मिळकतीचा कर अर्थात घरफाळा भरला आहे की नाही, हे पाहिले जाणार आहे. घरफाळा भरला असेल तरच परवानगी, मंजुरी मिळणार आहे. त्याचप्रमाणे जन्म, मृत्युचे दाखले घरफाळा भरला असेल तरच दिले जाणार आहेत. हा नियम महापालिकेच्या हद्दीतील मिळकतधारांनासाठी सक्तीचा करण्यात आला आहे.
“महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरफाळा वसुली वेगाने होणे गरजेचे आहे. त्यामुळेच घरफाळा भरल्याशिवाय कोणताही दाखला अथवा मंजुरी, परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतधारकांनी सहकार्य करावे.”
-विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त कोल्हापूर महापालिका
असा आहे घरफाळा विभाग
शहरातील एकूण मिळकती ः 1 लाख 56 हजार
घरफाळा वसुलीचे उद्दीष्ट ः 78 कोटी
आजपर्यंत झालेली वसुली ः 40 कोटी
वसुल करावयचा घरफाळा ः 38 कोटी
वसुलीसाठी शिल्लक कालावधी ः साडेतीन महिने








