प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळात घरपट्टी वाढविण्यात आल्याने मालमत्ताधारकांवर आर्थिक बोजा वाढला आहे. त्यामुळे वाढीव घरपट्टी रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक संघटनेने महापालिकेला दिले होते. पण याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वाढीव घरपट्टीमुळे मालमत्ताधारकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सध्या नोकरी, व्यवसाय, सर्वच क्षेत्रात मंदी पसरल्याने उदरनिर्वाह करणे कठिण झाले आहे. अशा स्थितीत महापालिकेने घरपट्टी वाढविली असल्याने शहरवासीय अडचणीत आले आहेत. घरपट्टी वाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीसाठी माजी नगरसेवक संघटनेने जिल्हा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिले होते. पण याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे माजी नगरसेवक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची भेट घेऊन घरपट्टी वाढीबाबत विचारणा केली. घरपट्टी वाढ रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला नाही. सध्या प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी कामकाज पहात आहेत. त्यांच्या आदेशानंतर व प्रशासनाच्या सूचनेनुसार घरपट्टी वाढ रद्द केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. त्यामुळे माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवार दि. 8 रोजी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन घरपट्टी वाढ रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव माजी नगरसेवक दीपक वाघेला यांनी दिली. माजी नगरसेवकांनी सोमवार दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.









