मनपा अधिकारी-महसूल निरीक्षक पोटनिवडणुकीच्या कामात व्यस्त : महसूल वसुलीवर परिणाम होण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात गुंतले आहेत. एरव्ही मार्च-एप्रिल महिन्यात घरपट्टी वसूल करण्याची मोहीम राबविण्यात येते. पण यंदा महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने महसूल विभाग पूर्णपणे सुनासुना झाला आहे. त्यामुळे 2020-21 आर्थिक वर्षाच्या महसूल वसुलीवर परिणाम होण्याची शक्मयता आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीमुळे केवळ निवडणूक कार्यालयात अधिकाऱयांची गर्दी दिसू लागली आहे. मात्र, अन्य कार्यालये ओस पडली आहेत. महापालिका कार्यक्षेत्रात दोन मतदारसंघ असल्याने मनपाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागात शांतता पसरली आहे. एरव्ही मार्च व एप्रिल महिन्यात मालमत्ता कर वसुलीच्या कामात मनपाच्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी व्यस्त असतात. पण निवडणूक मतदार यादी आणि निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 45 कोटी मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 35 कोटी मालमत्ता कर वसूल झाला आहे. आणखी 10 कोटी रुपये वसुली झाल्यास घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होणार आहे. पण सध्या मनपाचे अधिकारी व कर्मचारी लोकसभा पोटनिवडणुकीच्या कामात व्यस्त झाल्याने उद्दिष्टपूर्ती होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
5 टक्के सवलत
एप्रिल महिन्यात आर्थिक वर्षाचा कर भरणाऱया मालमत्ताधारकांना 5 टक्के सवलत देण्यात येते. ऑनलाईन कर भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली असल्याने नागरिकांना मालमत्ता कर भरण्यास सोयीचे झाले आहे. चलन मिळण्यास विलंब होणार नसल्याने 5 टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे.









