पुढील वर्षीच घरपट्टीत वजा करण्याची मनपाला सूचना : 100 टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेकडून आगाऊ घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे जुलै महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आली. पण सवलतीची मुदत वाढविण्यापूर्वी अनेक मालमत्ताधारकांनी घरपट्टी जमा केली होती. मात्र घरपट्टी जमा केलेल्या मालमत्ताधारकांनाही सवलत देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे.
आर्थिक वर्षाची घरपट्टी एप्रिल महिन्यात आगाऊ भरणाऱया मालमत्ताधारकांना घरपट्टीच्या रकमेवर पाच टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत केवळ एक महिन्याच्या कालावधीकरिता लागू असते. पण मागील वषी कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले होते. व्यवसायही बंद ठेवण्यात आल्याने शहरवासियांची आर्थिक स्थिती बिकट बनली होती. त्यामुळे एप्रिल महिन्यात घरपट्टी जमा करणे अशक्मय बनले होते. त्यामुळे पाच टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबत माजी नगरसेवक संघटनेने नगरविकास खात्याला निवेदन दिले होते. त्यामुळे पाच टक्के सवलतीच्या मुदतीत जुलै अखेरपर्यंत वाढ करण्यात आली. मात्र, पाच टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय विलंबाने झाल्याने असंख्य मालमत्ताधारकांना सवलतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे संपूर्ण घरपट्टी जमा केलेल्या मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. घरपट्टी भरणा केलेल्या मालमत्ताधारकांना पुढील वषीच्या घरपट्टीत पाच टक्के सवलतीची रक्कम वजा करण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यामुळे घरपट्टीची सवलत मिळाली नसलेल्या मालमत्ताधारकांना आता पाच टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे.
तसेच 2020-21 या आर्थिक वर्षाची घरपट्टी जमा करणाऱया मालमत्ताधारकांसाठी पाच टक्के सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. सध्या एक महिन्याकरिता पाच टक्के सवलत देण्यात येणार असून शंभर टक्के घरपट्टी वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नगरविकास खात्याने सवलतीची मुदत वाढविली आहे. त्यामुळे 2020-21 आर्थिक वर्षाची घरपट्टी भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी एक महिन्याच्या आत घरपट्टी जमा केल्यास पाच टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या मालमत्ताधारकांना पाच टक्के लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.









