प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टीच्या माध्यमातून स्वच्छता व्यवस्थापन सेस तसेच पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. अखेर नगर विकास खात्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच टक्के सवलतीची मुदत वाढविली आहे. मालमत्ताधारकांना 30 जूनपर्यंत पाच टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. याबाबतचा अधिकृत आदेश नगरविकास खात्याने बजावला आहे.
एप्रिलमध्ये घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येते. लोकसभा निवडणूक आणि क्लोजडाऊनमुळे नागरिकांना एप्रिलमध्ये घरपट्टी भरता आली नाही. अशातच घरपट्टीत कचरा व्यवस्थापन शुल्क दुप्पट आकारण्यात येत आहे. त्यामुळे घरपट्टीतील वाढ रद्द करावी आणि पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत तरुण भारतने पाठपुरावा चालविला होता. यापूर्वी मागील वर्षी प्रथम 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामध्ये पुन्हा वाढ करून 31 जुलैपर्यंत करण्यात आली होती. तसेच मार्चअखेर नगरविकास खात्याने आदेश बजावून ज्या मालमत्ताधारकांनी पाच टक्के सवलतीचा लाभ घेतला नाही. त्यांना 5 टक्के सवलत देण्यासाठी 19 मार्च 21 पर्यंत मुदत देण्यात आली होती. यंदा लोकसभा पोटनिवडणूक व त्यानंतर पुन्हा कोरोना वाढल्याने मालमत्ताधारकांना घरपट्टी भरता आली नाही. त्यामुळे मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने शासनाने 30 जूनपर्यंत 5 टक्के सवलतीच्या मुदतीत वाढ केली असल्याने मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नगर विकास खात्याने पाच टक्के सवलतीची मुदत वाढविली असल्याने मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे.









