प्रतिनिधी/ चिपळूण
लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्समध्ये 20 मार्च रोजी झालेल्या स्फोटातील जखमी अभिजित सुरेश कवडे या रिसर्च ऑफिसरचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून त्यांची मृत्यूंशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. यामुळे स्फोटातील मृतांची संख्या पाच झाली आहे.
खेड तालुक्यातील लोटे वसाहतीमध्ये कृषी रसायन निर्मिती करणाऱया घरडा केमिकल्स लि.मध्ये 20 मार्च रोजी रिऍक्टरचा स्फोट झाला. यामध्ये चारजणांचा जागीच मृत्यू झाला होता तर अभिजित कवडे गंभीर जखमी झाले होते. गंभीर अवस्थेत अभिजीत यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे कुटुंबियही त्यांना रूग्णालयात पाहून आले होते. मात्र रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कवडे यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच कंपनी व्यवस्थापन, कामगारांसह त्यांच्या मित्र परिवारात सर्वानाच धक्का बसला.
एमएस्सी झालेले अभिजीत 2008मध्ये कंपनीत रिसर्च ऑफिसर म्हणून रूजू झाले. पाग नाका येथील मधुबन पार्कमध्ये ते रहात होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक पाच वर्षाची मुलगी व तीन महिन्यांचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे.
वर्गमित्रांचा प्रवेश अन् शेवटही एकाचवेळी
घरडामधील स्फोटात भागाडी-सकपाळवाडी येथील आशिष चंद्रकांत गोगावले हा तरूणही मृत्यूमुखी पडला. अभिजित आणि आशिष हे दोघेही येथील डीबीजे महाविद्यालयात एमएस्सीपर्यंत शिकले. कॅम्पस इंटरव्ह्यूमधून या दोघांची रिसर्च ऑफिसर म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर हे दोघेही वर्गमित्र एकाचवेळी 2008 मध्ये कंपनीत एकाच पदावर रूजू झाले आणि कंपनीत झालेल्या स्फोटात एकापाठोपाठ हे जग सोडूनही गेले. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेले पाचहीजण ऐन उमेदीतील तरूण असल्याने त्यांच्या जाण्याने कंपनी व्यवस्थापन व कामगारवर्गात दहा दिवसांनंतरही दु.खाची छाया कायम आहे.









