वार्ताहर/ लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कृषी रसायन निर्मिती करणाऱया घरडा केमिकल लिमिटेड कंपनीत शनिवारी सकाळी 8.20 च्या सुमारास सात नंबरच्या प्लॅन्टमध्ये रिऍक्टरचा स्फोट झाला. या स्फोटात 4 कामगारांचा मृत्यू तर अन्य एक गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये दोघे चिपळूणचे आहेत. तासाभराच्या बचावकार्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.
स्फोटाने एमआयडीसी हादरली
बाळासाहेब रामचंद्र गाढवे (खेर्डी-चिपळूण), महेश महादेव कासार (बीड), राजेश मानतकर (औरंगाबाद), आशिष चंद्रकांत गोगावले (32, भागाडी-चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. अभिजित सुरेश तावडे गंभीर जखमी असून पुढील उपचारार्थ ऐरोली-नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी पहिल्या पाळीचे काम सुरू असताना हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होती की अवघी एम.आय.डी.सी. हादरली होती.
प्रशासकीय यंत्रणा मदतकार्यात गुंतल्या
स्फोटाची खबर मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक बंब घटनास्थळी पोहोचले. अन्य ठिकाणच्या बंबांनाही पाचारण करण्यात आले. घरडा आपत्ती व्यवस्थापनचे दीपक गमरे, ओढल, मंदार मराठे, आर. सी. कुलकर्णी, जमले आदींचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला.
तिघांचा जागीच मृत्यू
रिऍक्टरच्या स्फोटाने लागलेल्या आगीत 3 कामगार होरपळले तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. बाळासाहेब गाढवे, महेश कासार, राजेश मानतकर यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. आशिष गोगावले व अभिजित तावडे या दोघांना कंपनीच्या रूग्णवाहिकेने लवेल येथील घरडा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आशिष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अभिजित याची प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारासाठी एरोली-नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले.
मोठी दुर्घटना टळली
7 नंबरच्या प्लॅन्टमध्ये एक्सो कार्बो रसायन तयार केले जाते. पहिल्या शिफ्टमध्ये 40 कामगार होते. दुर्घटना घडली त्यावेळी बरेचसे कामगार नाष्टय़ासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. याचमुळे मोठी जीवीतहानी टळली. आतापर्यंत एमआयडीसीत मोठय़ा स्फोटाची ही तिसरी घटना घडली आहे.
प्रशासकीय अधिकाऱयांसह पदाधिकारी घटनास्थळी
घटनास्थळी प्रांतअधिकारी अविशकुमार सोनोने, पोलीस उपविभागीय अधिकारी काशिराम काशिद, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव, उपनिरीक्षक सोमनाथ कदम, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर, पं. स. सभापती मानसी जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, जि.प. सदस्य अरूण चव्हाण, सुनील मोरे, विक्रांत जाधव, आवाशी सरपंच राज आंब्रे, महेश नाटेकर, एस. के. आंब्रे आदी घटनास्थळी पोहोचले.
औद्योगिक सुरक्षेसह प्रदूषणचे अधिकारी फिरकलेच नाहीत
प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी आली तरी कामगार आयुक्त कार्यालय, औद्योगिक सुरक्षा विभाग व प्रदूषण मंडळाचे अधिकारी तेथे फिरकलेही नाहीत. याबाबत साऱयांनी संताप व्यक्त करत टीकेची झोड उठवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱयांचा मोबाईलही स्वीच ऑफ असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटना गंभीर असतानाही संबंधित अधिकारी घटनास्थळी हजर नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे.