प्रतिनिधी/ सातारा
सर्वसामान्य माणसाला आपल्या बजेटनुसार हक्काचे घर मिळणे अवघड होत चालले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या घरकुल मेळाव्यामुळे सातारकरांना एकाच ठिकाणी फ्लॅटस्, प्लॉटस् व कमर्शिअल प्रोजेक्टस्ची माहिती मिळणार असून सर्व सामान्यांचे आपले घराचे स्वप्न आपल्या बजेटमध्ये पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी केले. दरम्यान, दोन दिवस सुरु असलेल्या या घरकूल मेळाव्यास सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित घरकुल मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी किशोर शिंदे बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर वसंत गागरे, असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, सेक्रेटरी श्रीराज दीक्षीत, उपाध्यक्ष अनुप शिंदे, माजी अध्यक्ष रामदास जगताप, सचिन देशमुख, मंगेश जाधव, संतोष जगताप, हनुमंत वळसे, पृथ्वीराज पाटील, अनिल दातीर, क्रीडा संघटक इर्शाद बागवान, बन्सीशेठ असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजन वसंत गागरे यांनी बिल्डर्स असोसिएशनचे घरकुल मेळाव्याच्या आयोजनाबद्दल कौतुक केले व यापुढेही असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
यावेळी अशोक शिंदे म्हणाले की, घरकुल मेळाव्यात 45 स्टॉल्स असून सातारा जिल्हा व अन्य ठिकाणचे नामंवंत बिल्डर्स, डेव्हलपर्स, वित्तीय संस्था व अन्य साहित्याचे स्टाल्स् यामध्ये सहभागी झाले आहेत. घरकुल मेळाव्यात तुमच्या बजेट व लोकेशन नुसार सर्व पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्वरीत कर्ज सुविधाही वित्तीय संस्थांतर्फे मिळणार आहेत. सातारा शहरातील सर्व नामवंत बिल्डर्स या मेळाव्यात सहभागी झाले असून सातारा शहराच्या चारही दिशांचे रेसिडेन्सीअल, कमर्शिअल तसेच प्लॉटींग प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली सातारकरांना उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मान्यवरांचे स्वागत असोसिएशनतर्फे अध्यक्ष अशोक शिंदे, सेक्रेटरी श्रीराज दिक्षीत उपाध्यक्ष अनुप शिंदे, पृथ्वीराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्रीराज दिक्षीत यांनी केले. घरकुल मेळाव्या पहिल्या दिवसापासूनच सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.









