ऑनलाईन टीम / पुणे :
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे निमित्त साधून ‘चपराक प्रकाशन’ची तब्बल दहा ई-बुक आणि घनश्याम पाटील यांच्या ‘दरवळ’ या पुस्तकाचे प्रकाशन होणे ही फार मोठी गोष्ट आहे. साहित्य आणि प्रकाशनविश्वाला मरगळ आल्याचे सांगितले जात असतानाच या घरकोंडीतील वेळेचा सद्उपयोग करत ‘चपराक’ने ही जी ग्रंथनिर्मिती केली आहे ती कौतुकास्पद आहे. लॉकडाऊनमुळे मनोरंजनाची सर्व साधणे बंद आहेत. टीव्ही पाहूनही लोक कंटाळले आहेत. अशावेळी वाचकांच्या बुद्धिला चालना देणारी पुस्तके प्रकाशित करणे ही म्हणूनच मोठी गोष्ट आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी घनश्याम पाटील यांचे दरवळ हे वैचारिक लेखांचे पुस्तक, सदानंद भणगे यांची अमानवी विनवणी ही गूढ कादंबरी, रवींद्र कामठे यांचे तारेवरची कसरत हे अनुभवकथनाचे पुस्तक, सुनील पवार यांची राजस भाग्य ही कादंबरी, डॉ. भास्कर बडे यांचा बाईचा दगड आणि किरण सोनार यांचा हजार धागे सुखाचे हे कथासंग्रह, गडहिंग्जल येथील शिवराज महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. किसनराव कुराडे यांचे भारतीय लोकसंख्येचा भस्मासूर हे सामाजिक पुस्तक, कृपेश महाजन यांचा अनिमा अनिमस हा कवितासंग्रह, शिरीष देशमुख यांचा बारीकसारीक गोष्टी हा बालकथासंग्रह आणि पुंडलिकजी कातगडे यांनी लिहिलेले राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धनबुवा यांचे चरित्र अशा दहा ई-बुक्सचे कुलगुरू डॉ. करमळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ. करमाळकर म्हणाले, सध्याच्या निराशावादी वातावरणात ‘चपराक’ने साहित्यिक निष्ठेतून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे. वाचकांनी त्यांना भरघोस प्रतिसाद देणे हे कर्तव्य आहे. विशेषतः घनश्याम पाटील यांनी अत्यंत नियोजनपूर्वक शिवराज्याभिषेकदिनी हा कार्यक्रम घडवून आणला. त्यामुळे माझ्या माहितीनुसार लॉकडाऊनमधला हा पहिला प्रकाशन सोहळा पार पडत आहे. आपल्या कार्याशी प्रामाणिक राहत अशा साहित्यनिष्ठा सिद्ध करणे हे धैर्याचे काम आहे. त्यामुळे त्याचा मला विशेष आनंद वाटतो. वाचनसंस्कृतीला बळकटी मिळण्यासाठी हा सकारात्मक उपक्रम निश्चितच दिशादर्शक ठरेल, याची मला खात्री आहे. यावेळी प्रकाशक घनश्याम पाटील, मुद्रितशोधनातील तज्ज्ञ अरूण कमळापूरकर, लेखक आणि कवी रवींद्र कामठे, उद्योजक प्रमोद येवले, शशी गहेरवार उपस्थित होते.