इनरव्हील क्लब, नगरपालिकेतर्फे आयोजन
प्रतिनिधी/ कराड
कराड नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये काम करणाऱया महिलांसाठी इनरव्हील क्लब ऑफ कराडतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा रुपाली डांगे व सचिव सीमा पुरोहित व इतर सदस्यांनी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची भेट घेऊन वेगळी संकल्पना म्हणून हळदी कुंकू समारंभ करण्याबाबत चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी नगरपरिषदेने अतिशय मेहनत घेऊन कायापालट केलेल्या बारा डबरे परिसरात कचरा हटवून उभारलेल्या सुंदर व आकर्षक उद्यानाला भेट तसेच कचऱयाचे विलगीकरण करणाऱया कचरा वेचक महिलांसोबत हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याची संकल्पना मांडली. त्याला इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी संमती दिली.
घनकचरा प्रकल्पाच्या उद्यानात आयोजित कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्ष प्रा. रुपाली डांगे म्हणाल्या की, इथले काम बघून आम्ही सर्वजण खूप भारावून गेलो असून इतका मोठा व शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा प्रकल्प येथे एवढय़ा चांगल्या पद्धतीने सुरु आहे, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची व गर्वाची बाब आहे. सकाळी घंटागाडी आली की त्यात कचरा टाकणे एवढीच प्रक्रिया आम्हाला माहिती होती. सर्व महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी या ठिकाणी आवश्य भेट द्यावी.
नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या की, समाजात दुर्लक्षित असणाऱया पण शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम करणाऱया या भगिनींचे काम सर्वांपर्यंत पोहोचून समाजाने त्याची दखल घ्यावी, या हेतुने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे. आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी चार वर्षात येथे झालेल्या कामांची माहिती दिली.
नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार, अनिता पवार, माया भोसले, पल्लवी पवार, सुनंदा शिंदे, काश्मिरा इंगवले, दीपाली दिवटे, गीता गायकवाड, अंजना कुंभार यांच्यासह प्रकल्पावर काम करणाऱया सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या. किरण कांबळे यांनी माहिती दिली. वैभव पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.








