कारखाना विक्रीस काढल्याची अफवा : आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे सभासदांना आवाहन
वार्ताहर / घटप्रभा
शेतकऱयांच्या विकासासाठी सहकारी तत्त्वावर सुरू करण्यात आलेला घटप्रभा साखर कारखाना कर्जबाजारी तसेच तो विक्रीस काढला आहे, अशा अफवा विरोधकांकडून पसरविण्यात आल्या आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले. घटप्रभा कारखाना आवारात आयोजित ऊस वाहतूकदार, कंत्राटदार यांच्या सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, घटप्रभा सहकारी साखर कारखाना कोणाची खासगी संपत्ती नाही. कारखाना शेतकरी सभासदवर्गाचा असून त्याची विक्री करण्याचा कोणालाही हक्क नाही. कारखाना कर्जबाजारी असल्याने विक्रीस काढण्यात आला आहे, अशी अफवा जाणीवपूर्वक विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. या षङ्यंत्राला शेतकरी सभासदवर्गाने बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याच्या आर्थिक उन्नतीसाठी बोरगाव येथील अरिहंत सोसायटीकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जातून शेतकऱयांचे थकित ऊस बिल भागविण्यात आले आहे. विरोधक या कर्जाचे भांडवल करून घटप्रभा साखर कारखाना कर्जबाजारी आहे, अशी अफवा पसरवित आहेत. 1992 पासून घटप्रभा साखर कारखाना आपल्या नेतृत्त्वाखाली इतर कारखान्यांपेक्षा ऊस उत्पादकांना वाढीव दर व वेळेत ऊस बिल देत आहे. कारखान्याकडून शेतकऱयांची फसवणूक कधीही करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
यंदा सप्टेंबरऐवजी 15 ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरू करण्याचे लक्ष्य आहे. व्यवस्थापक विभागाने सभासद, ऊस उत्पादकांची दिशाभूल करून अफवा पसरविणाऱयांवर कारवाई करण्यास मागे राहू नये. येत्या दोन वर्षात कारखान्याचा सर्वांगीण विकास करून शेतकऱयांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. संचालक मंडळ आपल्या मार्गदर्शनाखाली उत्तम कार्य करीत असल्याचेही जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी उद्योजक अभिनंदन पाटील, उत्तम पाटील, सिद्धाप्पा गदाडी यांच्यासह सभासद, ऊस वाहतूकदार, मालकवर्ग व कंत्राटदार उपस्थित होते.









