चाचणी यशस्वी : ताशी 110 कि. मी. वेग
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज-लोंढा या मार्गावरील घटप्रभा ते कुडची दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी या मार्गावर विद्युत इंजिन धावले. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिन धावल्याने ते पाहण्यासाठी स्थानकात गर्दी झाली होती. ताशी 110 कि. मी. वेगाने रेल्वेचे इंजिन धावल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे इंधन बचतीसोबतच रेल्वेची गती वाढण्यास मदत होणार आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून मिरज ते लोंढा या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. दुपदरीकरणामुळे क्रॉसिंगसाठी रेल्वे कुठेही थांबणार नाही. यामुळे रेल्वेचा प्रवास कमी वेळेत होईल. त्याचबरोबर इंधन बचत होण्यासाठी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. यामुळे रेल्वेची गती वाढणार आहे. टप्प्याटप्प्याने या मार्गावरील काम सुरू ठेवण्यात आले आहे. या दरम्यान घटप्रभा ते कुडची यामधील दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले होते. विद्युतीकरणासाठी रेल्वे ट्रकशेजारी विद्युतखांब उभारण्यात आले होते. मध्यंतरी कोरोनामुळे हे काम रखडले होते.
रेल्वे कर्मचाऱयांत आनंद
सोमवारी या दोन रेल्वेस्थानकादरम्यान इलेक्ट्रिक इंजिनद्वारे चाचणी घेण्यात आली. बेळगाव विभागात प्रथमच इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली. ताशी 110 कि. मी. वेगाने इंजिन धावले. चाचणी यशस्वी पद्धतीने पूर्ण झाल्यामुळे रेल्वे कर्मचाऱयांनी आनंद व्यक्त केला. याचसोबत इतर टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे व इतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत इलेक्ट्रिक इंजिनची चाचणी घेण्यात आली.









