तब्बल दहा महिन्यांनंतर शाळेला प्रारंभ,
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे तब्बल 10 महिने इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग बंद होते. राज्य शासनाच्या निर्णयामुळे सातारा शहरासह जिह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. शाळांची घंटा खणाणली अन् मुलांच्या चेहरे आनंदाने खुलले. आपल्या मित्र-मैत्रिणीला पहायला मिळणार असल्याने सर्वांना आतुरतला लागली होती ती अखेर बुधवारी संपुष्टात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेच्या शाळेमध्ये मुलांची काळजी घेतली जात होती. विशेष म्हणजे गुरुकुल स्कूलमध्ये खास करुन मुलांच्या हातात मोजे, डोक्यावर प्लास्टिकची टोपी दिसत होती. तसेच वर्गशिक्षकच पालक बनून ज्ञानार्जनाचे काम करत होते.
शाळेत आपले मित्र, शाळेतले शिकवणारे शिक्षक, शाळेचे मैदान या सगळयाचा गेल्या दहा महिन्यापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विसर पडला होता. मुलांना शिक्षण हे मोबाईल, संगणकावर घराच्या घरीच दिले जात होते. तब्बल दहा महिन्यानंतर शहरासह जिह्यातील शाळांची घंटा खणाणली. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांच्या मनात भीती होतीच. तरीसुद्धा मुलांना पाठवण्यासाठी सकाळपासून पालकांची घाई दिसत होती. अगोदरच मुलांचे दप्तर, शाळेचे साहित्य, ड्रेस तयार करुन मुलांना जाताना पालकांनी आर्वजून मास्क, सॅनिटायझरची बाटली दप्तरात दिली होती. शाळेत मुलांना पोहचवण्यासाठी पालकांची गर्दी दिसत होती. शाळेच्या बाहेर शाळा व्यवस्थापनाने सोशल डिस्टन्स पाळूनच एकेका मुलांना टेम्परेचर चेकींग करुन आतमध्ये घेतले जात होते. हातावर सॅनिटायझर देवून प्रत्येक बाकावर एकेकच विद्यार्थी बसवण्यात येत होते. वर्गीशिक्षकांच्यावरच विद्यार्थ्यांची जबाबदारी दिली होती. आज पहिल्या दिवशी मोजकेचे तास शिकवून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.








