मृतांमध्ये 12 महिलांचा समावेश- बस-ऑटोची टक्कर
वृत्तसंस्था / ग्वाल्हेर
मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी ऑटो आणि बस यांच्यात टक्कर होऊन 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ऑटोचालक आणि 12 महिलांचा समावेश आहे. सर्व महिला रात्री अंगणवाडीत शालेय मुलांसाठी स्वयंपाक तयार करून परतत होत्या. 9 महिला आणि चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तीन महिलांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले आहे.
ग्वाल्हेर येथून मुरैना रस्त्यावर ऑटो जात असताना बसची धडक बसली आहे. दुर्घटनेतील 9 मृतांची ओळख पटली आहे. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी ग्वाल्हेर प्रादेशिक परिवहन अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत, नोकरी आणि मुलांना उच्च शिक्षणापर्यंतचे मोफत शिक्षण देण्याची मागणी करत लोकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला आहे. काँग्रेस आमदार प्रवीण पाठक आणि सतीश सिकरवार यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन अधिकाऱयांनी दिल्यावर मृतदेह स्वीकारले गेले. राज्य सरकारने प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
दुर्घटनेत जीव गमाविणाऱया सर्व 12 महिला दोन ऑटोंमधून परतत होत्या. यातील एका ऑटोत केवळ 3 प्रवासी बसविण्याची क्षमता असताना 6 महिलांना बसविण्यात आले होते. वाटेत एका ऑटोमध्ये बिघाड झाल्याने एकाच ऑटोमध्ये 12 महिलांना बसविण्यात आले हेते. याचमुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे.









