म्हैसूर येथे जन्मलेले वेंकट बार्कलेज बँकेच्या सीईओपदी
वृत्तसंस्था / लंडन
जगातील उद्योगजगतात भारतीयांचे प्रभुत्व सातत्याने वाढत आहे. बार्कलेजचे सीईओ जेस स्टेले यांच्याजागी सी.एस. वेंकटकृष्णन बँकेचे सीईओ होणार आहेत. बार्कलेजमध्ये वेंकटकृष्णन यांनी आतापर्यंत ग्लोबल मार्केट प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
ऍडोबचे सीईओ म्हणून शांतनू नारायण हे काम पाहत आहेत. बाटाच्या 126 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संदीप कटारिया यांना ग्लोबल सीईओची जबाबदारी मिळाली आहे. अल्फाबेटमध्ये सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला हे सीईओ हे पद सांभाळत आहेत. अजयपाल सिंह बग्गा हे मास्टरकार्डचे अध्यक्ष तसेच सीईओ आहेत. अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि सीईओपदी जयश्री उल्लाल आहेत. याचबरोबर नोकियाचे सीईओ म्हणून राजीव सूरी काम पाहत आहेत.
भारतीयांच्या या मांदियाळीत आता वेंकटकृष्णन यांचे नाव जोडले गेले आहेत. बार्कलेज बँक पीएलसीचे सह-अध्यक्ष म्हणून ते यापूर्वी काम पाहत होते. तसेच बार्कलेजच्या कार्यकारी समितीचे सदस्यही होते. वेंकट यांनी यापूर्वी बार्कलेजचे चीफ रिस्क ऑफिसर म्हणूनही काम पाहिले आहे.
सुधारणा घडविणार
बार्कलेज बँकेपूर्वी वेंकटकृष्णन यांनी 1994-2016 या कालावधीत जेपी मॉर्गन चेजमध्ये अनेक वरिष्ठ पदावर काम केले होते. असेट मॅनेजमेंट व्यवसायात वरिष्ठ पदांवर काम केल्यावर त्यांनी सुमारे 200 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीला चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर म्हणून सांभाळत होते. तसेच इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि रिस्क यासारख्या विषयांमध्येही त्यांनी काम केले आहे. बार्कलेजमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रतिबद्ध असून यावर काम सुरूच राहणार असल्याचे वेंकटकृष्णन यांनी म्हटले आहे.
स्टेले यांना सोडावे लागले पद
ब्रिटनच्या नियामकांकडून दिवंगत फायनान्सर जेफ्री एपस्ठीन यांच्यासोबतच्या संबंधांच्या चौकशीनंतर जेस स्टेले यांना बार्कलेजच्या सीईओपदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. वित्तीय वर्तन प्राधिकरण आणि प्रूडेंशियकडून करण्यात आलेल्या चौकशीच्या प्रारंभिक निष्कर्षाबद्दल कळले होते. हा निष्कर्षाबद्दल संचालक मंडळ निराश असल्याचे बँकेने म्हटले आहे.
विक्रमी नफा
स्टेलेने बार्कलेजला अनेक अवघड काळांमधून यशस्वीपणे बाहेर काढले होते. बार्कलेजच्या गुंतवणूक रणनीतिविषयक त्यांच्या निर्णयांमुळे वादही निर्माण झाला होता. बार्कलेजने महामारीच्या प्रारंभिक टप्प्यांमध्ये गुंतवणुकीतून विक्रमी नफा कमाविला होता. वरिष्ठ पदावरील बदलानंतर देखील स्वतःच्या गुंतवणूक व्यवसायावर मजबुतीने लक्ष देत राहणार असल्याचे बार्कलेजने म्हटले आहे.









