वृत्तसंस्था/ विज्क ऍन झी (हॉलंड)
येथे सुरू असलेल्या टाटा स्टील्स पुरस्कृत मास्टर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत टॉप सीडेड ग्रॅण्डमास्टर मॅग्नस कार्लसनने सातव्या फेरीतील डावामध्ये भारताच्या प्रज्ञानंदचा पराभव करत आघाडीचे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत भारतीय ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथीला पहिल्या पराभावाला सामोरे जावे लागले.
सातव्या फेरीतील एका पटावर झालेल्या लढतीत हॉलंडच्या ग्रॅण्डमास्टर फॉरेस्टने निमझो इंडियन बचाव तंत्राचा अवलंब करताना विदित गुजराथीचा 36 व्या चालीत पराभव करत पूर्ण एक गुण वसूल केला. या स्पर्धेतील गुजराथीचा हा पहिला पराभव असून आता तो पाचव्या फेरीअखेर स्पर्धेच्या गुणतक्त्यात 4 गुणांसह संयुक्त तिसऱया स्थानावर आहे.
सातव्या फेरीतील सामन्यात ग्रॅण्डमास्टर कार्लसनने भारतीय ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदचा 34 व्या चालीत पराभव केला. या विजयामुळे कार्लसनने 5 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. ग्रॅण्डमास्टर मॅमेडॅरोव्ह 4.5 गुणांसह दुसऱया, विदित गुजराथी, रिचर्ड रेपोर्ट आणि इस्पेंको व अनीश गिरी हे प्रत्येकी समान 4 गुणांसह संयुक्त तिसऱया स्थानावर आहेत. कर्जाकीन, कारुआना आणि फॉरीस्ट हे प्रत्येकी 3.5 गुणांसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत.









