वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या 42,22,190 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या वेस्टर्न आणि सदर्न पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत ग्रीसच्या चौथ्या मानांकित स्टीफॅनोसस सिटसिपेसने एकेरीची तिसरी फेरी गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचा पराभव केला.
रविवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात सिटसिपेसने दोनवेळा ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱया अँडरसनचा 6-1, 6-3 असा पराभव केला. सिटसिपेसने या सामन्यात चारवेळा अँडरसनची सर्व्हिस तोडत 69 मिनिटात आपला विजय नोंदविला. ग्रीसचा सिटसिपेस याने आतापर्यंत एटीपी टूरवरील पाच स्पर्धा जिंकल्या आहेत.
अमेरिकेच्या जॉन इस्नेरने पोलंडच्या हुरकेझचा 7-5, 6-4, ऑस्ट्रेलियाच्या मिलमनने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा 4-6, 6-4, 7-6 (7-2), अर्जेंटिनाच्या शुवार्झमनने रूडचा 7-6 (7-2), 6-3, गोफीनने क्रोएशियाच्या कोरिकचा 7-6, (8-6), 6-4, रशियाच्या कॅचेनोव्हने कझाकस्तानच्या बुबलिकचा 6-4, 6-4, बल्गेरियाच्या डिमिंट्रोव्हने फ्रान्सच्या हंबर्टचा 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले.









