ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन उठवून चालणार नाही. लॉकडाऊन उठवल्यानंतरच्या परिणामांची मला जाण आहे. त्यामुळे मी राज्याला धोक्यात घालणार नाही. रेड झोनमधील निर्बंध शिथिल करणे योग्य होणार नाही. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात कालपासून लागू करण्यात आलेल्या चौथ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, राज्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. मार्चपासून लॉकडाऊन लागू केला नसता तर राज्यातील परिस्थिती भयानक झाली आहे.पावसाळ्यापूर्वी आपल्याला कोरोना संपवायचा आहे. त्यामुळे रेड झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात येतील. मात्र, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योग आणि दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक सण, समारंभ यापुढेही बंदच राहतील. शाळा, कॉलेज कशी सुरू करता येतील याचा विचार चालू असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
राज्यात 50 हजार उद्योगांना परवानगी राज्यात 50 हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 5 ते 7 लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत. तसेच नवे उद्योग राज्यात आणण्यासाठी 40 हजार एकर जमीन राखीव ठेवण्यात आली आहे. नवीन उद्योजकांनी महाराष्ट्रात यावे, महाराष्ट्रातील उद्योजकांनीही उद्योग स्थापन करावेत. नव्या उद्योजकांना भाडेतत्त्वावर जमीन देऊ. प्रदूषण न करणाऱ्या उद्योगांना कोणत्याही अटी राज्य सरकार घालणार नाही.
राज्यात 1 हजार 424 कोविड सेंटर
राज्यात 1 हजार 424 कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. बांद्रा, गोरेगाव, रेसकोर्स, वरळी, ठाणे, मुलुंडमध्ये ही केअर सेंटर आहेत. मुंबईत 1 हजार बेडसचे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. आता ऑक्सिजनची सुविधा असणारे बेडस उभे करण्यावर भर देण्यात येत आहे.आरोग्य सुविधा आणि ॲम्बुलन्स वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.









