अनिल कांदळकर यांची शिवसेनेवर टीका :
मसदे-चुनवरे ग्रा.पं.वर भाजप प्रणित पॅनेलचा विजय निश्चित!
प्रतिनिधी / मालवण:
मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीवर गेल्या पाच वर्षांत शिवसेना प्रणित पॅनेलची सत्ता होती. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार पाहता, गावच्या सर्वांगिण विकासाच्या दाखविलेल्या स्वप्नांचा पूर्णपणे बट्टय़ाबोळ झाला आहे. शिवसेनेचे सरपंच पाच वर्षात एकदाही ग्रामसभा पूर्ण करू शकले नाहीत. खड्डेमय रस्ते, दिखाव्यापोटी केलेली भूमिपूजने आणि कामांची आश्वासने यामुळे यावेळी मतदार भाजपप्रणित पॅनेलच्या पाठिशी उभा आहे. या निवडणुकीत भाजपचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करताना दिसत आहे, असे मसदे-चुनवरे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रणित पॅनेलचे प्रमुख मार्गदर्शक व प्रचारप्रमुख अनिल कांदळकर यांनी सांगितले.
शिवसेनेने पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासासाठी एकाही रुपयाचा निधी दिलेला नाही. शासनाच्या योजनांचीही प्रामाणिकपणे अंमलबजावणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करू शकले नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थी शासकीय फायद्यांपासून वंचित राहिले आहेत. गावातील शेतकऱयांना कसलेही मार्गदर्शन करण्यात आलेले नव्हते. निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून विजयी झाल्यानंतर मतदारांना वाऱयावर सोडण्याचे काम सत्ताधाऱयांनी पाच वर्षांत केले आहे. यामुळे जनतेचा विश्वास आता उडालेला आहे, अशी टीका कांदळकर यांनी केली आहे.
विकास करण्याची धमक राणेंमध्येच!
भाजप नेते नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकप्रतिनिधी असताना गावातील प्रत्येक वाडीवर नळयोजना, प्रत्येक वाडीवर पथदीप अशी कामे करत सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मतदारांच्या अडीअडचणींना सदैव मदतीसाठी पुढे राहिलो. निराधारांना हक्काचा आसरा मिळण्यासाठी अनेकांना घरेही मिळवून दिली. प्राथमिक शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यात मसदे-चुनवरे गावच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहून आम्ही मतदारांसमोर जात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱयांच्या हिताचे निर्णय घेऊन एकप्रकारे सन्मान केला आहे. विरोधी पक्षांकडून फक्त राजकारण केले जात आहे, असेही कांदळकर म्हणाले.
विरोधकांना मते मागण्याचा अधिकार नाही!
विरोधकांना मते मागण्याचा अधिकारच राहिलेला नाही. शासकीय योजनांचा निधी वगळता आमदार वैभव नाईक अगर खासदार विनायक राऊत यांनी धोरणात्मक विकासकामांसाठी एकही रुपयाचा निधी ग्रामपंचायतीला दिलेला नाही. ग्रामस्थांना समाधान वाटेल, असे एकही काम ग्रामपंचायत दाखवू शकत नाही. मोबाईल रेंजचा विषय कायमस्वरुपी प्रलंबित आहे. रखडलेले रस्ते यावर तर सत्ताधारी बोलण्याचे धाडस करत नाहीत. मतदारांना खूष करण्यासाठी चुनवरे रस्त्याचे भूमिपूजन आमदारांनी केले, मात्र आतापर्यंत या रस्त्याचे कामच झालेले नाही. यामुळे आता सत्ताधारी पुन्हा एकदा धनशक्तीचा वापर करण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी मतदार प्रामाणिकपणे काम करणाऱया व्यक्तींच्याच हातात सत्ता देणार आहेत, असा विश्वास अनिल कांदळकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार-प्रभाग 1-दत्ताराम आंबेरकर, किरण कांदळकर, सुचित्रा सावंत. प्रभाग 2-कलाधर कुशे, धनश्री कांदळकर, शमिका वाडकर. प्रभाग 3-रामदास पांजरी, अनिल जाधव, श्रेया परब.









