राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : निवडणुका लवकर घेण्याबाबतही चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर घेण्याचा आणि निवडणुका होईपर्यंत प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिकार अवधी संपुष्टात आलेल्या ग्रा. पं. चा कार्यभार काही दिवस प्रशासकीय अधिकाऱयांमार्फत चालणार आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी प्राकार परिषदेत याविषयी माहिती दिली. या महिन्यात राज्यातील 6 हजार पेक्षा अधिक ग्रा. पं. साठी निवडणुका होणे गरजेचे होते. तथापि, सरकारने लॉकडाऊन मार्गसूचीनुसार निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता. मात्र, सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत विस्तृत चर्चा झाली.









