प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यातील 479 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मदार तब्बल 18 हजार 510 अधिकारी, कर्मचाऱयांवर राहणार आहे. त्याअनुषंगाने आदेश निर्गमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठकही पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रत्नागिरी जिह्यात 56 टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत. त्यासाठी आदर्श आचारसंहितेचे पालनही सुरू झाले आहे. निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठकही जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यामध्ये निवडणुकीसह 18 जानेवारीला होणाऱया मतमोजणीच्या नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.
निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती यापूर्वी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत 1 हजार 597 मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व इतर कर्मचारी असे एकूण 18 हजार 510 कर्मचारी आवश्यक आहेत. याशिवाय झोनल अधिकारी व चार निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या सर्व निरीक्षकांची सभा लवकरच होणार आहे.
निवडणुकीसाठी आवश्यक मतदानयंत्रे, उपलब्ध यंत्रे, अन्य आवश्यक बाबी याचा अहवाल तयार करण्याचे कामकाज जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. संवेदनशील मतदान केंद्रांसंदर्भात पोलीस विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.
सदस्यसंख्येनुसार उमेदवार खर्चाची मर्यादा
ग्रामपंचायत निवडणूक खर्चाची मर्यादा सदस्य संख्येवर आधारित आहे. निकालानंतर एक महिन्यात खर्च सादर करावा लागणार आहे.









