प्रतिनिधी / सातारा :
थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी महावितरणचे अधिकारी वाघ यांनी ग्राहकांच्या मागे तगादा लावला आहे. लॉकडाऊनमधून शिथीलता मिळाल्याने सोमवारपासून सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत. यामुळे व्यावसायिक वीज बिल भरण्यासाठी मुदत मागत आहेत. तरीही महावितरणाचे अधिकारी वाघ आरेरावीची भाषा करून ग्राहकांना वीज बिल भरण्याचा दम भरत आहेत.
सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यवसाय बंद झाल्याने कर्जाचा भार वाढला आहे. सोमवारपासून जरी निर्बंध शिथिल झाले तरी लगेच व्यवसाय वाढीस लागणार नाही. यामुळे इतर खर्चासह वीज बिलाचा भरणा करण्यासाठी अनेक ग्राहक महावितरणाकडे साकडे घालत आहेत. दररोज महावितरणचे कर्मचारी वीज तोडणीसाठी सर्वत्र फिरत आहेत. वीज बिल भरण्यास ग्राहक तयार आहेत. मात्र, मुदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहेत. पण, महावितरणचे अधिकारी ग्राहकांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. वीज बिल भराच अन्यथा वीज पुरवठा खंडीत करतो, असा दमच भरत आहेत. यामुळे वीज बिलाच्या नावाखाली महावितरणकडून ग्राहकांची पिळवणूक सूरू आहे.









