तरुण भारतच्या बातमीची दखल
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राहकांकडून वीज बिल वसूल करूनही ते हेस्कॉम कार्यालयात न भरता परस्पर वापरणाऱया मीटर रिडरवर कारवाई करण्यात आली. हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्यास सांगितले होते. ग्राहकांनी दिलेल्या लेखी तक्रारींमुळे त्या कर्मचाऱयाचे निलंबन करण्यात आले. तरुण भारतने विजबिलाचे पैसे लाटल्याचे वृत्त दिल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे असे प्रकार करणाऱया इतर कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
महाद्वार रोड परिसरात एका मीटर रिडरने ग्राहकांकडून विजेच्या बिलाची रक्कम वसूल केली होती. परंतु ती रक्कम त्याने कार्यालयात भरलीच नाही. ज्या वेळी हेस्कॉमचे इतर कर्मचारी महाद्वार रोड परिसरात बिल न भरलेल्या ग्राहकांची चौकशी करीत होते त्यावेळी हा प्रकार समोर आला. यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. कुंपणच शेत खात असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचे? असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत होता.
तरुण भारतने दुसऱयाच दिवशी या घडलेल्या प्रकारचे वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल अधीक्षक अभियंता गिरीधर कुलकर्णी यांनी घेतली. त्यांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. बिल भरले अशी तक्रार करणाऱया ग्राहकांकडून सर्व माहिती जमा करण्यात आली होती. चौकशीअंती त्या कर्मचाऱयाचे निलंबन करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
हेस्कॉम कर्मचाऱयांचे धाबे दणाणले
यापूर्वीही ग्रामीण भागात असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. परंतु याची माहिती वरि÷ अधिकाऱयांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ही प्रकरणे मिटविण्यात आली होती. परंतु यावेळी मात्र काही नागरिकांनी पुढाकार घेतल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली. कर्मचाऱयाचे निलंबन झाल्याने असे प्रकार करणाऱया कर्मचाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
ही चूक ग्राहकांचीच
प्रत्येक महिन्याला आलेले विजेचे बिल भरण्यासाठी ऑफलाईन व ऑनलाईन अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हेस्कॉमच्या बिल भरणा केंद्रासोबतच बेळगाव वन कार्यालयातही विजेचे बिल स्वीकारले जाते. त्याच सोबत ऑनलाईन हेस्कॉमच्या वेबसाईटवर तसेच गुगल पे, पेटीएम, फोन पे, अमॅझोन पे यासारख्या मोबाईल वॉलेटमधूनही बिल भरता येऊ शकते. इतके पर्याय उपलब्ध असतानाही मीटर रिडरकडे बिलाची रक्कम देणे हे कितपत योग्य आहे, हे ग्राहकांनी लक्षात घेण्याची गरज आहे.









