प्रतिनिधी /बेळगाव
महसूल, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठय़ासह 84 सरकारी खात्यांच्या 800 सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी 26 जानेवारीपासून ‘ग्राम-वन’ केंदे सुरू करण्यात आली आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
हिंडलगा ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गणेशपूर येथे सुरू करण्यात आलेल्या ग्राम-वन सेवा केंद्राला जिल्हाधिकाऱयांनी भेट दिली. नागरिकांना शासकीय सेवा समर्पकपणे पुरवाव्यात, अशी सूचना त्यांनी केंद्रातील ऑपरेटरना केली. सरकारच्या उद्देशाला धक्का पोहोचू नये, याची काळजी घेत नागरिकांना सेवा देण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली.
प्रत्येक सेवेसाठी शुल्क ठरविण्यात आले आहे. सरकारने ठरविल्याप्रमाणेच शुल्क आकारावे. सरकारी मार्गसूचींची काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. जिल्हय़ात 778 ग्राम-वन सेवा केंदे सुरू करण्यात आली आहेत. यापैकी 84 खात्यांच्या 800 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राम-वन सेवा केंद्रांच्या ऑपरेटरांची बैठक झाली. यावेळी अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, सेवासिंधू संयोजक अतिष ढाले आदी उपस्थित होते.









