ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार उत्तम आरोग्य सेवा
प्रतिनिधी /बेळगाव
ग्राम पंचायत ‘आरोग्य अमृत’ योजनेला सोमवारी ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी चालना दिली. सुवर्ण विधानसौधमध्ये राज्यातील सर्व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱयांचा मेळावा सुरू आहे. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी या योजनेला चालना देण्यात आली.
दोन दिवसांच्या मेळाव्याला के. एस. ईश्वराप्पा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ग्राम पंचायत ‘आरोग्य अमृत’ ही योजना प्रामुख्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी इतर खात्यांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे ईश्वराप्पा यांनी सांगितले.
रोपटय़ाला पाणी घालून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण विकास व पंचायत राज्य खाते, आरोग्य व कुटुंब कल्याण खाते व केएचपीटीच्या सहभागातून संपूर्ण देशात प्रथमच ‘आरोग्य अमृत’ योजना जारी करण्यात येत आहे. 14 जिह्यातील 110 तालुक्मयांतील 2 हजार 816 ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही योजना राबविण्यात येत आहे. बेळगाव, बागलकोट, बळ्ळारी, विजयनगर, गदग, चामराजनगर, दावणगेरे, गुलबर्गा, कोप्पळ, मंडय़ा, म्हैसूर, रायचूर, विजापूर, यादगीर जिह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतींना 25 हजार कीट देण्यात येणार आहे, असे ईश्वराप्पा यांनी सांगितले.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. कर्नाटकात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ग्राम पंचायतींचे कार्य मोलाचे आहे. आरोग्य खाते, पोलीस खाते, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांबरोबरच वेगवेगळय़ा शासकीय खात्यांच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी उत्तम सेवा बजावली आहे. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. कोरोना व क्षयमुक्त कर्नाटक निर्मितीचा ध्यास घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केएचटीपीचे प्रमुख मोहन एच. एम., ग्रामीण विकास व पंचायत राज्य खात्याचे मुख्य सचिव एल. के. अतिक, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह राज्यातील जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते. .









