रात्री उशिरापर्यंत अर्ज माघारीबाबत आकडय़ांची जुळवाजुळव सुरूच
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायतीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी सोमवार दि. 14 रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. मात्र निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे रात्री उशिरापर्यंत सावळा गोंधळ सुरू होता. यामुळे आकडेवारी रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही.
पहिल्या टप्प्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू होता. अर्ज माघारी आणि बिनविरोध आलेल्या उमेदवारांची आकडेवारींची जुळवाजुळव करताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये अर्ज माघार घेतले जात असताना त्याचा लेखाजोखा ठेवताना अधिकाऱयांची तारांबळ उडत होती. बेळगाव तालुक्यातील 55 ग्रा. पं. ची निवडणूक 22 डिसेंबर रोजी होत आहे. काही ग्रा. पं.चे सदस्य अधिक असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. त्यामुळे आकडेवारी मिळू शकली नाही.









