वन खात्याचा गलथान कारभार चव्हाटय़ावर : ग्राम पंचायतींमार्फत सामाजिक वनीकरणांतर्गत रोप लागवडीसाठी खड्डय़ांची खोदाई
वार्ताहर /सांबरा
बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींमार्फत सामाजिक वनीकरणांतर्गत रोपे लावण्यासाठी खड्डे खणून ठेवण्यात आले आहेत. मात्र, पावसाळा संपत आला तरी वन खात्याकडून संबंधित ग्राम पंचायतींना अद्याप रोपे पुरविण्यात आली नाहीत. त्यामुळे वन खात्याचा गलथान कारभार चव्हाटय़ावर आला असून संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
बेळगाव तालुक्मयामध्ये दरवषी अनेक रोपांची लागवड केली जाते. त्याचप्रमाणे यावषीही विविध रोपांची लागवड करण्यासाठी म्हणून तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींनी रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याच्या बाजूला, तलावांच्या बाजूला व सरकारी जागेत रोपे लावण्यासाठी खड्डे खणले आहेत. खड्डे खोदण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत महिलांनी परिश्रम घेतले आहेत. यासाठी ग्राम पंचायतींनी रोजगार हमी योजनेमधून लाखो रुपये खर्ची घातले आहेत. मात्र, पावसाळा संपत आला तरी वन खात्याने अद्याप कोणत्याही ग्राम पंचायतीला रोपे पुरविली नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे प्रमुख प्रशांत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. त्यामुळे रोपे न पुरवण्याचे नेमके कारण काय? हे समजू शकले नाही. तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी याबाबत वन खात्याच्या अधिकाऱयांना जाब विचारून तातडीने सर्व ग्राम पंचायतींना रोपे पुरविण्यासाठी तगादा लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
…अन्यथा शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होणार
बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींनी याबाबत वन खात्याकडे पाठपुरावाही केला. मात्र संबंधित अधिकाऱयांकडून थातूरमातूर उत्तरे देण्यात येत आहेत. वेळीच रोपांची लागवड झाली नाही तर खड्डे खोदण्यासाठी खर्ची घातलेल्या शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होणार आहे. पावसाळय़ामध्ये जर रोपांची लागवड झाली तर झाडे वाचू शकतात. यासाठी दरवषी पावसाळय़ामध्येच रोपांची लागवड केली जाते. दरवषी रोप तयार करण्यासाठी वन खात्याकडून लाखो रुपये खर्ची घालण्यात येतात. जर वेळेत रोपांची लागवड झाली नाही तर सामाजिक वनीकरण कसे होणार? त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्नही नागरिकांतून विचारण्यात येत आहे.









