प्रतिनिधी / बोरगाव
संपूर्ण देशात व राज्यात गेली सहा महिने झाले कोरोना संपता संपेना परंतु या महिनाअखेर ग्रामीण भागातील विकासाचा वेग मंदावला आहे. कोरोना संपणार कधी आणि थांबलेला विकास सुरू होणार कधी हाच प्रश्न ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
ग्रामीण भागातील नळपाणी योजना, अंतर्गत रस्ते, गटर, डांबरीकरण आदी विकास कामे मंजूर होऊन त्याचा शुभारंभ ही अनेक गावांत झाला परंतु मार्च अखेरीस जगभरात सुरू झालेली कोरोनाची महामारीचे लोण बगता बगता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरले आणि देश लॉकडाऊन झाला. गेली सहा महिने जनता रोगाची आणि प्रशासन आरोग्याच्या सेवेशी सामना करत आहे. परंतु महामारीची साखळी तुटता तुटेना, कोरोना संपणार कधी व ग्रामीण भागातील रखडलेला विकास सुरु होणार कधी हाच ग्रामीण भागातील जनतेला प्रश्न पडला आहे.
तालुक्यातील अनेक गावाच्या मंजूर असणाऱ्या पाणी योजनेची कामे सुरू होती काही कामे मंजूर आहेत तर काही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत अंतर्गत रस्ते, खडीकरण, आर.आर. सी गटर, डांबरीकरण, चौक सुशोभिकरण आदी विकास कामे प्राधान्याने होणे गरजेचे आहे. तालुक्यातील नदीकाठच्या गावातील विकास कामांना गेल्या वर्षी आलेला महापूर व चालू वर्षी आलेला कोरोना यामुळे सलग दोन वर्षे खो बसला आहे. सद्या पावसाळा संपल्यामुळे मंजूर विकास कामावरील निधी ३१ मार्च पर्यंत खर्च करणे सक्तीचे असल्यामुळे ही विकास कामे त्वरीत व्हावी. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याबरोबर विकासाला ही वेळीच गती मिळाली तर त्या गावाचा सर्वांगीण विकास होऊन गावाचा चेहरा – मोहरा बदलण्यास मदत होईल. आगामी काळात ग्रामीण भागातील ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक पातळीवर रखडलेल्या विकास कामांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांना वेळीच गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात सुरु असलेली कामे कोरोनामुळे मजुर उपलब्ध होत नसल्याचे कारण देत बंद ठेवली आहेत. शासनाने अनेक कामे सुरू करण्याचा आदेश देऊन अद्याप ठेकेदारांची कामे गतीने सुरु करण्यासाठीच्या हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळे अशा ठेकेदारांना कामे त्वरित सुरु करण्याचे आदेश शासनाने द्यावेत अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी करत आहेत.
Previous Articleकोरोना मुक्तीसाठी साईभक्तांची शिर्डीला पायी वारी
Next Article …तर एकावेळी दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढू








