कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी उपाययोजना : मंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात जारी करण्यात आल्याप्रमाणेच इतर भागातही डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात येतील. याबाबत आदेश देण्याची सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना देण्यात येईल, असे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळामुळे हानी झालेल्या उडुपी जिल्हय़ातील मरवंते या भागात पाहणी केल्यानंतर उडुपी जिल्हा पंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रत्येक तालुक्यात 15 डॉक्टर, 40 नर्सिंग कर्मचाऱयांची टीम 15 वाहनांमधून दोन दिवसातून एकदा खेडय़ांमध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करतील. आवश्यकता भासली तर उपचारही करतील. अधिक उपचारासाठी तालुका इस्पितळात दाखल करण्यात येईल. या व्यवस्थेमध्ये वैद्यकीय पदव्यत्तर विद्यार्थी, एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. या टीमसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येतील. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज, ऑक्सिमीटरसह सर्व सुविधा पुरविण्यात येतील. प्रत्येक टीमला आठवडय़ातून तीन दिवस सक्तीने एका खेडय़ामध्ये जावून आरोग्य तपासणी करावी लागणार आहे, अशी माहिती मंत्री आर. अशोक यांनी दिली.
लॉकडाऊन वाढविणे योग्य ठरेल
लॉकडाऊनबाबत अलिकडेच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा, हे आपले वैयक्तिक मत आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील. लॉकडाऊन जारी असणाऱया महाराष्ट्र, दिल्ली राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने कमी होत आहे. बेंगळूरसह शहरी भागात वास्तव्यास असलेले लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे खेडय़ांमध्ये संसर्ग वाढत आहे, असे ते म्हणाले.









