गावात महिनाभर कोरोना रुग्ण सापडलेला नसावा
प्रतिनिधी/मुंबई
ज्या गावांमध्ये मागील एक महिन्यापासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसेल, तसेच भविष्यात ही गावे कोरोनामुक्त राखण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते केला असेल, अशा गावात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यास मंजुरी दिली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
राज्यातील शेवटच्या घटकातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मिश्रित शिक्षणाचा दृष्टिकोन बाळगणे ही काळाची गरज बनली आहे. ही बाब लक्षात घेऊन दूरस्थ शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासोबतच कोरोनामुक्त ग्रामीण भागांत कोरोना प्रतिबंधकतेची संपूर्ण खबरदारी घेऊन शाळा सुरु करीत आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
खरे तर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत निर्णय सोमवारी जारी केला. पण अवघ्या काही तासांतच या निर्णयाबाबत शिक्षण विभागाने यु टर्न घेतला. या निर्णयात काही तांत्रिक त्रुटी असल्याचे कारण देत संकेतस्थळावरून हा निर्णय हटवण्यात आला. त्यामुळे शिक्षण खात्यातला सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाटÎावर आला. आवश्यक त्या दुरुस्ती करून तो पुन्हा जारी करण्यात येईल अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली होती. त्याप्रमाणे शिक्षण मंर्त्यांनी हा निर्णय पुन्हा जाहीर केला आहे.
पुढील काळात कोरोनाच्या तिसर्या लाटेवर राज्य सरकार आणि शिक्षण विभागाचे पूर्ण लक्ष असेल. ज्या गावात एक महिन्यापासून एकही कोरोना रुग्ण आढळला नसेल. तसेच ज्या गावातील सरपंच, तलाठी, वैद्यकीय अधिकारी आणि शालेय शिक्षण समिती या सर्वांनी मिळून गाव कोरोनामुक्त राखण्याचा ठराव सर्वानुमते केला असेल, अशा गावात 15 जुलैपासून शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचबरोबर शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. तसेच पालकांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.








