पाणी साठवण्यासाठी उपाययोजना हवी : संबंधित ग्रामपंचायतींनी नाल्यांचे संरक्षण आवशयक : नाल्यांचे पाणी अडवण्याची मागणी

वार्ताहर /किणये
ग्रामीण भागातील अनेक गावांच्या लगत नाले आहेत. हे नाले नद्यांना जाऊन मिळालेले आहेत. या नाल्यांमध्ये बऱयापैकी पाणीसाठा असल्यास याचा उपयोग शेतीसह जनावरांना होतोय. मात्र सद्यस्थितीत बहुतांशी भागातील नाले हे दुर्लक्षित झालेले आहेत. नाल्यांमध्ये केरकचरा टाकण्याच्या प्रकारात वाढ झाली असून झाडेझुडुपांच्या विळख्यात सदर नाले सापडलेले आहेत.
गेल्या पाच-सहा वर्षात ग्रामीण भागातील अनेक नाल्यांवर छोटे छोटे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. त्यावर पाणी अडविण्यासाठी फळय़ा बसविण्याचीही सोय करण्यात आली आहे. पण हे नाले झाडेझुडुपे व केरकचऱयाच्या विळख्यात सापडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या नाल्यांची पाहणी करून नाल्यांच्या नियोजनासाठी धोरणात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे.
बऱयाच गावांमध्ये रोजगार हमी योजेनेंतर्गत नाल्यांची साफसफाई तसेच खोदाई करण्याचे काम सुरू आहे. केवळ रोजगार हमी योजनेपुरते या नाल्यांचे कामकाज होते. रोजगार हमीचे काम झाल्यानंतर ग्राम पंचायतीचे या नाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहे. यामुळे पुन्हा नाल्यांमध्ये केरकचरा व माती भरून नाले अरुंद होऊ लागले आहेत, अशी माहिती पश्चिम भागातील काही शेतकऱयांनी दिली आहे.
नाल्यांमध्ये अतिक्रमण अधिक झाल्यामुळे व साफसफाई न झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यावेळेस अनेक रस्त्यांवर नाल्यांचे पाणी आले होते. किमान रस्त्यावर पाणी आल्यानंतर तरी ग्राम पंचायतीने नाल्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
शेतीला जोडव्यवसाय म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. प्रत्येकाच्या गोठय़ामध्ये एक-दोन दुभती जनावरे आहेत. शेतकरी दिवसभर जनावरांना चरण्यासाठी सोडतात. सायंकाळी घरी परतताना त्या जनावरांना पिण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र सद्यस्थितीत नाले कोरडय़ा अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी नाले व बंधारे आहेत अशा ठिकाणी नाल्यांचे पाणी अडविण्याची गरज आहे. त्याचा फायदा जनावरांना होऊ शकतो.
नाल्यामधील सांडपाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित

बेनकनहळ्ळी येथील केंबाळ्ळी नाला दुर्लक्षित झाला आहे. या नाल्यामध्ये सांडपाणी येत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सरस्वतीनगर, ज्योतीनगर, गणेशपूर येथील सांडपाणी या नाल्याला येऊन मिळते. सदर नाल्यात केरकचरा मोठय़ा प्रमाणात टाकण्यात येऊ लागला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वीच ग्राम पंचायतीच्यावतीने बेनकनहळ्ळीनजीकच्या नाल्याची साफसफाई केली होती. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे. या नाल्याच्या बाजूला सार्वजनिक विहीर असून या विहिरीचे पाणी गावाला पुरविण्यात येते. काही वेळेला विहिरीचे पाणी दूषित होऊ लागले आहे. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी तोडगा काढण्याची गरज आहे.
-बाबाजी देसूरकर, बेनकनहळ्ळी
अतिक्रमण झाल्याने पावसाचे पाणी थेट शिवारात

बेळगुंदी येथील नाला शेतीसाठी महत्त्वाचा आहे. पण नाल्यामध्ये केरकचरा टाकण्यात आला असून नाला झाडाझुडुपांनी वेढलेला आहे. बोकनूरजवळून हा नाला आला असून बेळगुंदी पुलाजवळून शेतशिवारातून मार्कंडेय नदीला हा नाला मिळाला आहे. पावसाच्या दिवसात नाल्यात पाणीसाठा असतो. त्यावेळी शेतातील पिकांना पाणी मिळू शकते. नाल्यामध्ये अतिक्रमणही झाले आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्यास नाल्याचे पाणी थेट शिवारात जाण्याचे प्रकारही गेली दोन वर्षे झालेले आहेत. या नाल्याची साफसफाई करण्याची गरज आहे.
– विश्वनाथ चव्हाण, बेळगुंदी









