पंचायत क्षेत्रात उभे झाले कचऱयाचे ढिगारे, रोगराई पसरण्याचे चिन्हे
प्रतिनिधी / पणजी
गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात सतावत असलेली कचऱयाची समस्या आता ग्रामीण भागातही निर्माण झाली आहे. गावागावात ठिकठिकणी कचऱयाचे ढिगारे जमा होऊ लागले आहेत. जमा करून ठेवलेल्या कचऱयातून घाण वास येत आहे. त्यामुळे गावागावातून रोगराई पसरण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ग्रामस्थांसमोर नवी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर वेळीच तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पंचायतीमार्फत गावात घराघरातून गोळा केलेला कचरा वेळीच न उचलल्यामुळे एका ठिकाणी ढीग करून ठेवलेला कचरा कुजतो आणि त्याच्यातून दुर्गंधी पसरते. भटके कुत्रे कचऱयाच्या पिशव्या फोडतात व त्याच्यातील कचरा अस्तव्यस्त पसरून टाकतात. स्वच्छ भारत योजने अंतर्गत प्रत्येक घरातील कचरा गोळा करून गाव स्वच्छ ठेवणे ही योजना जरी चांगली असली, तरी त्याची अमंलबजावणी योग्यतऱहने होणे तितकेच गरजेचे आहे. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊन गावागावात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. सरकारने यावर वेळीच उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
स्वच्छ भारत योजनेचे बटय़ाबोळ
आज संपूर्ण जागाबरोबरच भारतही कोरोना सारख्या भयानक रोगावर आळा घालण्यासाठी एक युध्द लढत आहे. प्रत्येक नागरिकांनी या युध्दात सक्रियपणे भाग घेतलेला दिसून येत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात कचऱयामुळे निर्माण झालेली रोगराई ही नवीन समस्या ग्रामस्थांसमोर निर्माण झाली तर सर्व सामान्य लोकांचे काय होईल याचा विचारही करणे कठीण आहे. गावगावात निर्माण झालेले कचऱयाचे ढिगारे व कुत्र्यांनी अस्तव्यस्त करून टाकलेला कचरा हे सगळे चित्र पाहिल्यास स्वच्छ भारत योजनेचा बटय़ाबोळ झाल्याचे दिसून येत आहे.
कचऱयाच्या समस्येचे गांर्भीय नाही
कचरा समस्या ही आज किंवा काल नव्हे, तर ती माणसाच्या जन्मापासूनच सुरू झालेले समस्या आहे. पुर्वी कचऱयाचे प्रमाण कमी असल्याने याकडे गांर्भीयाने पाहिले जात नव्हते. सध्या माणूस आधुनिकतेच्या दिशेने वेगान पळत आहे. प्रत्येक गोष्ट ही सहज आणि सोपी कशी करता येईल, याच्याकडे प्रत्येकाचा कल आहे त्यामुळे विविध समस्य निर्माण होत आहेत. कचऱयाची समस्याही त्याच्यातीलच एक आहे. इतकी वर्षे ही समस्य शहरापुरतीच मर्यादित होती ती आता ग्रामीण भागातही पोहोचली आहे. सरकारने लोकांना काही गोष्टींची मुभा दिल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
सगळ्याच गोष्टींसाठी सरकारवर अवलंबून राहू नका
प्रत्येक घरातील कचरा पंचायतीने गोळा करण्यापेक्षा आपल्या घरातील कचऱयाची आपणच विल्हेवाट लावावी अशी सक्ती केली असती तर किमान ग्रामीण भागात तरी कचऱयाचे ढिगारे जमा झाले नसते. प्रत्येक घरातील व्यक्तीने आपल्या घरातील कचऱयाचे प्रमाण कमी होईल याच्याकडे लक्ष देण्याची सरकारने सक्ती करायला हवी, असे मत काही सुजाण ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. रोज उपयोगात येणारी कापडी पिशवी तसेच अशा अनेक गोष्टी असतात की ज्याचा पुन्हा उपयोग करता येतो. त्याच्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सर्रासपणे वापरात येणारे प्लास्टीक कसे बंद करता येईल याच्याकडेही प्रत्येकाने लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. सगळ्याच गोष्टी सरकारवर न ढकलता प्रत्येकाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अगोदर ग्रामीण भागात प्रत्येकजण आपल्या घरातील कचरा आपल्या शेतात टाकून त्याचे रुपांतर खतात करीत होते. ओला कचरा अंगणातील झाडांच्या मुळात पुरत होते तर सुका कचरा जो गुराना खाण्यासारखा होता तो गुरांना देत असे. इतर कचरा जाळून टाकला जात होता. या गोष्टी नियमितपणे होत होत्या त्यामुळे कुठेही कचऱयाचे ढीग दिस नव्हते. आज तसे का पेले जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावागावातील पंचायतींमार्फत घराघरात कचरा गोळा करून ठेवण्यासाठी प्लास्टीकची भांडी देण्यात आली आहेत. कचरा गोळा करणारा कर्मचारी रोज सकाळी येऊन कचरा गोळात करीत असतो. जमा केलेला कचरा एकाठिकाणी गोळा करून ठेवला जातो. हा कचरा येथून वेळीच उचलला जात नसल्याने त्याचे ढिगारे तयार होतात. वास्तविक सरकारने लोकांना प्रत्येक गोष्टीत सुविधा दिल्याने लोकांमध्ये आळसपण येतो व या आळसपणामुळेही अनेक समस्या निर्माण होतात.
प्लॅटमध्ये राहाणाऱया लोकांना त्यांच्या घरात जमा होणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावणे जागे अभावी शक्य नाही, ही गोष्ट कुणीही समजू शकते मात्र ग्रामीण भागात जे लोक घरात राहातात आणि ज्यांची जमीन आहेत असे लोक पंचायतीवर का अवलंबून राहतात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.









