मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली मागणी
जयसिंगपूर / प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत कृषीपंप वीज धारकांना वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्याचे महाराष्ट्रात स्वागत झाले आहे. त्याच धर्तीवर अडचणीत असलेल्या ग्रामपंचायतींना बळ देण्यासाठी ग्रामीण नळ पाणीपुरवठा वीज बिलांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन आपण केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
कोरोना महामारी, महापूर, परतीच्या पावसाचा तडाखा अशा एकामागून एक आलेल्या नैसर्गिक आपत्यांमुळे शहरी भागासह ग्रामीण भागाची देखील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतकर्यांसह सर्वसामान्य माणूस मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याचा परिणाम ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर होताना दिसत आहे. अशातच नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांमुळे विद्युत वितरण कंपनीकडून या योजनांचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना नागरिकांना पिण्याचे पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. थकित बिलांपोटी वीज पुरवठा खंडित करणे तातडीने थांबवावे, त्याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बिलांना सवलत देताना जो निर्णय घेतला तसाच ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांवरील वीज बिलाबाबत घेतला जावा आणि ग्रामपंचायतीना सहकार्य करावे, अशी मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन आपण केले असल्याची माहिती यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी दिली.








