प्रतिनिधी / सातारा :
‘सर्वांसाठी घरे 2022′ ही घोषणा शासनाने केली आहे, परंतु याच घरकुल योजनेचा महत्वाचा कणा असलेले ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मागील 7 महिन्या पासून मानधनापासून वंचित आहेत. अभियंता यांची दिवाळीसुध्दा वेतना विना अंधारात गेली. प्रती घरकुल 750 इतक्या तुटपुंज्या मानधनावर हे अभियंते 2016 पासून कार्यरत आहेत. त्यात वाढ व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला, परंतु त्यांच्या मानधनात जाचक अटी टाकून फक्त 200 रुपये वाढ करून अभियंता यांची कुचेष्टा केली.
या उलट अभियंता सोडून बाकी सर्व कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन वाढ दिली.
शासनाने यावर्षी 20 नोव्हेंबर 2021 पासून मोठय़ा थाटात महाआवास अभियान चालू केलं आहे. बाकी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या प्रति महावेतना प्रमाणे वेतन दिले नाही तर या महाआवास अभियानात राज्यभरातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी 1 डिसेंबर पासून बंदचा पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ ही घोषणा फसवी ठरते की काय? कोरोना सारख्या महामारीच्या काळात लाभर्थ्यांच्या घरी पोहचुन मागील वर्षी च महाआवास अभियान याच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी यशस्वी केलं होतं व ग्रामीण भागात सर्वाधिक प्रमाणात घरकुल योजना पोचवली होती. सातारा जिल्ह्याने याच अभियंत्यांच्या जीवावर महाआवास अभियानामध्ये विभागात बाजी मारली परंतु तेच अभियंते वेतन मिळन्यासाठी आज झगडत आहेत. या अभियंत्यांच्या राज्य संघटने तर्फे नुकतेच मा.संचालक ग्रामीण गृहनिर्माण दिघे यांना मानधन वाढ केलेल्या शासन निर्णय मध्ये बदल करून प्रतिमाह फिक्स वेतन घेण्यासाठी निवेदन दिले आहे अन्यथा काम बंद करण्याशिवाय पर्याय दिसत नसलेचे ही निवेदनाद्वारे सांगण्यात आले.









