युवराज भित्तम / म्हासुर्ली
सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधील व दाजीपुर अभयारण्या लगत असलेल्या घाटमाथ्यावर वसलेल्या दुर्गम अशा मानबेट, चौके (ता.राधानगरी) गावांनी सध्याच्या आधुनिक, तांत्रिक युगात पिढ्यान पिढ्या चालत आलेली ‘गावपळण’ ही प्रथा धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा जपला आहे. तीन वर्षातून एकदा गावपळण होत असून रविवारपासून दोन्ही गावचे ग्रामस्थ लवाजम्यासह गावा बाहेर निर्सगात राहायला गेले आहेत.
बर्याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख – समाधान लाभावे ही गावकर्यांची इच्छा असते. त्यांच्या कृतीतून जेव्हा ते स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण’. या प्रथेला मानबेट, चौके गावात धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
धामणी नदीच्या खोऱ्यात घाटमाथ्यावर वसलेल्या चौके, मानबेट, राई, कंदलगाव, मांडवकरवाडी आदी गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र या पैकी चौके,मानबेट या दोन गावांत गावपळण ही प्रथा दर तीन वर्षांनी आजही पाळली जाते. या मागे केवळ गावाचं सौख्य टिकवणं, गावकरी एकत्र गुण्यागोविंदाने राहावेत, हाच उदात्त हेतू या सर्व प्रथा व परंपरा टिकवण्यामागे असावा असं ग्रामस्थांना वाटते. श्रद्धा व अंधश्रद्धेच्या गर्तेत न जाता, त्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणं महत्त्वाचं. म्हणूनच आजही शेकडो वर्षाची परंपरा असलेली गावपळण प्रथा टिकून आहे.
‘गावपळण’ म्हणजे गावातून वेशी बाहेर पळून जाणं. अर्थात नेहमीच्या गावातील घर सोडून ठराविक काळासाठी गावकुसाबाहेर वस्तीला जाण. मानबेट, चौके ग्रामस्थ ग्रामदैवत रासाई देवीस कौल लावतात व देवीचा आदेश मानून साधारणत: हा मुक्काम पाच दिवस करण्यास गावाबाहेर जातात. यावेळी घरातील सर्व माणसांसह गुरं-ढोरं, कुत्रे-मांजरी, कोंबडय़ा व पाळीव पक्षी यांच्यासह आठवडाभर पुरेल इतकं धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे व पैसा अडका आदी गोष्टी सोबत घेऊन ‘गावपळण’ करण्यास गावाबाहेर पडतात. झाडांच्या फांद्या, वासे यांच्या साह्याने तात्पुरत्यां झोपड्या तयार करून ग्रामस्थ निर्सगाच्या कुशीत विसावतात.
पहिले तीन दिवस कोणी ही ग्रामस्थ गावात फिरकत नाही. चौथ्या दिवशी गावचे मानकरी ग्रामदेवता रासाई देवीला कौल लावतात.व देवीचा कौल अनुकूल लागेपर्यत थांबतात. त्यानंतरच सर्व ग्रामस्थ वाजत गाजत पुन्हा सर्व लवाजम्यासह भक्तीभावाने गावात प्रवेश करतात. त्यास ‘गावभरणी’ झाली असे म्हटले जाते.
सध्या चौके ग्रामस्थ कंदलगाव, मांडकरवाडी गावच्या तर मानबेट ग्रामस्थ पडसाळी गावच्या हद्दीत नदी किनारी राहत आहेत. गावपळण दरम्यान संपूर्ण गावात स्मशान शांतता परसलेली असून प्रत्येकाचं स्वतंत्र कुटुंब झापाच्या झोपडीत तात्पुरता संसार थाटून दैनंदिन जीवन जगत आहेत. भांडण तंट्याशिवाय वेशीवर बाहेर संपूर्ण गावानेच ठाण मांडलेले असल्याने जणू काही ‘महावनभोजन’ असल्याप्रमाणे हा ‘महाउत्सव’ सुरु आहे. या कालावधीत गावातील अबालवृद्धांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळत आहे. यात ना कुठे खंत, ना भांडण, ना वैर. यातूनच गावाचे गावपण व सलोखा जपण्याचं सामाजिक कार्य घडत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









