जिह्यात 30 देशी वाणांची शेती बहरली!
मनोज पवार/ दापोली
सकस, कीटकनाशकविरहित व रासायनिक खतांचा मारा न झालेले अन्न हा प्रत्येकाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी दापोली तालुक्यातील असोंड येथील ग्राम विकास समिती व प्रतिष्ठित नागरिक विश्वास गोंधळेकर यांनी कंबर कसली आहे. ते गेली तीन वर्षे यासाठी मेहनत घेत आहेत. या प्रयत्नांतून जिह्यातील प्रत्येक तालुक्यात 30 देशी वाणांच्या तांदळाची शेती बहरली आहे.
सकस व दर्जेदार अन्न खाऊन माणूस सुदृढ राहतो. हे सकस अन्न देशी म्हणजे स्थानिक वाणापासून मिळते. या देशी बियाण्यांच्या वापरासंबंधी देशभरात मोठय़ाप्रमाणात जागृती होत आहे. अनेक व्यक्ती, संस्था यासाठी पुढाकार घेत आहेत. पालघर जिह्यातील संजय पाटील हे बायफ या संस्थेच्या माध्यमातून देशी बियाणे संवर्धन, संरक्षण व प्रसाराचे काम करत आहेत. दापोली तालुक्यातील असोंड गावातील विश्वास गोंधळेकर यांनी असोंड ग्राम विकास समितीच्या माध्यमातून गेली 4 वर्षे संजय पाटील यांच्याकडून आणलेल्या प्रत्येकी 100 ग्रॅम तांदळाच्या 30 भाताच्या बियाण्यांची वाढ करून आज नुसते असोंड गाव नव्हे तर जिह्यातील प्रत्येक तालुक्यात या देशी वाणाने भातशेती फुलली आहे.
संजय पाटील यांच्याकडून विश्वास गोंधळेकर यांनी 4 वर्षांपूर्वी 30 प्रकारच्या देशी भाताचे बियाणे आपल्या शेतात पेरले. यातून हे बियाणे गुणाकाराच्या प्रमाणात वाढवले. यात त्यांना पत्नी वेदश्रीताईंची सक्षम साथ मिळाली. हे करत असताना त्यांनी प्रत्येक गोष्टीची बारीक नोंद ठेवली. प्रत्येक बियाण्याला लागणारा कालावधी, रोपांची उंची, आकार, रंग, गंध, चव, पेंढय़ाचा रंग आदी सर्व तपशील गोंधळेकर यांनी टिपून ठेवले. यानंतर त्यांनी गावात एक कमिटी स्थापन तिच्या माध्यमातून गावातील शेतकऱयांना देशी बियाणे वापरण्याचे आवाहन केले. गावोगाव बैठका घेतल्या. याला चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू तालुक्याच्या बाहेरुनही या बियाण्यांसाठी मागणी होऊ लागली. आज जिह्यातील सगळ्याच तालुक्यांमध्ये ही देशी वाणांची भात शेती तरारली आहे. येत्या काळात याचा प्रसार होऊन देशी वाण अधिक विकसित होईल व त्यातून सुदृढ पिढी निर्माण होईल, असा विश्वास असोंड ग्राम समिती व गोंधळेकर परिवाराने व्यक्त केला आहे.
गोंधळेकर यांनी चार वर्षांपूर्वी संजय पाटील यांच्याकडून जावयाची गुढी, नजर भात, लाल्या, म्हाडी, डीआरके जुना, एचएमटी काटे, कवळा, नंदहिरा, अश्विनी, धनसाळ, जुना कोलम, जोंधळी, चाकव, पुसा सुगंधा, सुरती कोलम, मसुरा, तुळश्या, जिरवेल, मसाला, कोकणी, मुळेशी, डोकनारी भात, आंबेगाव, राजघुडय़ा, हरियाणा, कशाबाई, मैसूर मल्लिगे, कुदरत, नवरा, लाल भात आदी देशी भाताच्या वाणांचे प्रत्येकी 100 ग्रॅम बियाणे आणले. आपल्या एक एकर जागेमध्ये त्यांनी या बियाण्यांची रुजवात केली. बियाणे वाढल्यानंतर त्यांनी जो मागेल त्याला हे बियाणे देण्यास सुरुवात केली. आज जिह्यातील सुमारे 100 शेतकऱयांच्या शेतात हे देशी वाण चांगले रुजले आहे.
विविध वैशिष्टय़पूर्ण जाती
देशी वाणांमध्ये जिरवेल, एचएमटी काटे यासारख्या चांगले उत्पन्न देणाऱया सुगंधी भाताच्या जाती आहेत. नंदनहिरासारख्या पौष्टीक व बारीक दाणा असलेल्या भाताच्या जातीदेखील आहेत. यातील नंदहिरासारख्या जाती दोन किलो बियाण्याला तब्बल 489 किलो उत्पन्न देणारी जातदेखील त्यांच्याकडे आहे. नजरभात हा जाडा व पोह्यासाठी चांगला तांदूळ आहे. यापैकी कोणत्या जाती बुटक्या आहेत, कोणत्या उंच, कोणत्या जाती पाणथळ जागेत तर कोणत्या जाती कमी पाण्यात वाढणाऱया आहेत याची त्यांनी चांगल्याप्रकारे नोंद ठेवली आहे.
दहा वर्षांत आजारपणाला थारा नाही!
गोंधळेकर यांनी छोटी घरगुती ब्राऊन राईस मिल विकत घेतली आहे. या राईस मिलमध्ये त्यांना 70 टक्के शंभर किलो भातापासून 70 किलो चांगल्या प्रतीचा तुकडा न पडलेला तांदूळ मिळतो. गोंधळेकर स्वतः 10 वर्षांमध्ये आजारी पडलेले नाहीत. या देशी वाणाचा भात घरी करायला सुरुवात केल्यापासून त्यांच्या मुलांना दवाखान्याची पायरी चढावी लागलेली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.









