सांगरूळ / प्रतिनिधी
गाव पातळीवर अनेक राजकीय गटतट व हेवेदावे असतात. यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकात मोठी चुरस निर्माण होते. या सर्वाला बगल देऊन म्हारूळ येथील दूध संस्था कर्मचारी संघटनेने गावातील जनतेचा विश्वास संपादन करून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली आहे. हे काम कौतुकास्पद आहे . म्हारुळ गावाचा हा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांना प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांच्या या निर्णयाचे बक्षीस म्हणून म्हारुळ गावाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली. म्हारूळ (ता. करवीर) येथील दूध संस्था कर्मचारी संघटनेने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते सर्किट हाऊस कोल्हापूर येथील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगऴे होते.
यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी ग्रामीण भागातील गावागावातून अशा पद्धतीने ग्रामस्थांमध्ये एकोपा झाल्यास गावामध्ये विकासाचे नवे पर्व निर्माण होईल .दूध संस्था कर्मचारी संघटना आणि ग्रामस्थ यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे बक्षीस म्हणून गावाला भरघोस असा निधी देऊ अशी ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी यावेळी दिली .
गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे कौतुक करतमारुतीच्या दूध संस्था कर्मचारी संघटनेचे काम कोल्हापूर जिल्ह्यातील इतर दूध संस्थांना आदर्शवत असल्याचे सांगितले.
दुध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सरदार पाटील यांनी दूध संस्था कर्मचारी संघटना म्हारुळ गावांमध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली . दुग्ध व्यवसाय वाढीसाठी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सर्व योजना दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत जाऊन राबविल्यामुळे ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले.ग्रामस्थांनीही संघटनेवर विश्वास दाखवल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळाले असल्याचे सांगितले.
यावेळी दूध संस्था संघटनेचे अध्यक्ष सरदार नारायण पाटील, रंगराव भगवान पाटील, सरदार पांडुरंग पाटील, सुभाष शंकर मांडेकर, अभिजीत शिवाजी चौगले ,उत्तम यशवंत पाटील ,संदीप बळवंत पाटील, संग्राम रंगराव चौगले, शिवाजी तुकाराम कुंभार ,गणेश लक्ष्मण कुंभार , डॉ .दीपक भैरू कांबळे ,दिलीप भास्कर चव्हाण यांचेसह जिल्हा दूध संघ संस्था संघटनेचे अध्यक्ष के .डी पाटील,उपाध्यक्ष शामराव पाटील ,जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील ,खजिनदार सुरेश जाधव ,उपस्थित होते .