प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यातील एकूण 11 ग्रामपंचायतीच्या मतमोजणी करिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल आणि बारा वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
खानापूर तालुक्यातील 13 गावात निवडणूक जाहीर झाली होती. तांदळगाव आणि भडकेवाडी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 11 ग्रामपंचायतीच्या 92 जागांसाठी शुक्रवारी उत्साहात मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. यासाठी मतमोजणी केंद्रावर 11 टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक आणि एक शिपाई असे 33 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. स्ट्रॉंग रूम कर्मचारी व अधिकारी तसेच सिलिंग स्टाफ आणि टेबलवरील असे एकूण 70 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.
मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे. मतमोजणी करिता उमेदवार, प्रतिनिधी यांना ओळख पत्र देण्यात आले आहे. ओळखपत्र शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी कक्षात मोबाईल आणता येणार नाही, असे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले. मतमोजणी करिता पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मतमोजणीची सर्व पूर्वतयारी झाली असून सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेले आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होऊन अकरा वाजेपर्यंत सर्व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असे तहसीलदार शेळके यांनी सांगितले.