21 हजार 32 अर्ज मंजूर; सोमवारी होणार चित्र स्पष्ट
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींतील 6301 सदस्यपदांसाठी 20 हजार 952 उमेदवारांनी दाखल केलेल्या 21 हजार 328 अर्जांची गुरूवारी छाननी करण्यात आली. यात 270 उमेदवारांचे 296 अर्ज बाद करण्यात आले. छाननीअंती 20 हजार 682 उमेदवारांचे 21 हजार 32 अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र सोमवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. तीन अपत्ये, मागील निवडणुकीचा खर्च दिला नाही, गुन्हेगारी पार्श्वभूमी, अतिक्रमण, ठेकेदारी आदी कारणे अर्ज नामंजूर करण्यामागे दिलेली आहेत.
तालुकानिहाय नामंजूर व मंजूर अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे. कंसात नामंजूर अर्ज
करमाळा (23) 1424, माढा (10) 2387, बार्शी (33) 2340, उत्तर सोलापूर (14) 738, मोहोळ (17) 2149, पंढरपूर (33) 3300, माळशिरस (40) 1851, सांगोला (13) 2587, मंगळवेढा (23) 887, दक्षिण सोलापूर (32) 1544, अक्कलकोट (58) 1825 एकूण (296) 21032.
येत्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. अजुनही काही ठिकाणी बिनविरोधचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काही ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे.









