गोडोली / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जुलै २०२० पासून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलेल्या होत्या. सध्या कोरोनाचे संकट कमकुवत झाल्याने निवडणूक आयोगाने सदरच्या निवडणुका घेण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक घेण्यासंदर्भात प्रभाग रचना आणि आरक्षण अहवाल तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून डिसेंबर ते जानेवारी महिन्यात सदरच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे.
जुलै २०२० पासून मुदत संपली तरी कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगाने तहकूब करून पुढे ढकलल्या होत्या. प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू ठेवले असले तरीही अपेक्षित काम होत नाही. यावेळी कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण अहवालास अंतिम मंजुरीबाबत दि.३० आँक्टोंबर अखेर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या उपायुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करताना मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा अहवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मंजुरी देण्यात यावी.या प्रक्रीयेसाठी दि.२७ ऑक्टोंबर ही मुदत जाहीर करण्यात आली आहे.तर जिल्हाधिकारी यांनी त्यास दि.२ नोव्हेंबर रोजी नमुना ‘ अ ‘ मध्ये व्यापक प्रसिद्धी द्यावी”,अशी सूचना करण्यात आली आहे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ च्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे. राज्यातील तब्बल १४६०० च्या दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे आता गावोगावी गाव पुढाऱ्यांना निवडणुकीचा फिव्हर चढायला सुरुवात होऊ लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक राज्य आयोगाकडून नव्याने सुचना आणि नियमावली जाहीर होण्याची शक्यता असून त्याचे पालन करत निवडणुका पार पडतील.








