ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा खासदार गौतम गंभीर याला ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गंभीर याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्याच्या घराबाहेर सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
श्वेता चौहान म्हणाल्या, आयएसआयएस काश्मीरने 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9 वाजून 32 मिनिटांनी एका ई-मेलमध्ये गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा आशयाचे पत्र गंभीर याच्या कार्यालयाकडून आम्हाला प्राप्त झाले असून, त्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून तपास करावा, असे म्हटले आहे. या तक्रारीवरुन आम्ही तपास सुरू केला असून, त्याच्या घराबाहेर सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे.