बंदरं, वीज नि अन्य पायाभूत साधनसुविधा क्षेत्रांमध्ये विलक्षण गतीनं चमकत चाललेल्या ‘अदानी समूहा’नं आता विमानतळांच्या विश्वातही आपले पाय रोवलेत…त्याला बळकटी दिलीय ती ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’मधील हिस्सा खरेदी करण्यात मिळविलेल्या ताज्या यशानं…
अब्जाधीश गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा बाजी मारलीय…त्यांच्या कंपनीनं ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’मधील (एमआयएएल) तब्बल 74 टक्के हिस्सा घशात घालण्यात यश मिळविलंय…शिवाय अदानी यांना सुवर्णसंधी मिळणार ती 16 हजार कोटी रुपयांच्या ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’ची निर्मिती करण्याची…त्यामुळं ‘जीव्हीके ग्रुप’ व गौतम अदानी यांच्यात चालू असलेली लढाई देखील संपलीय. ‘जीव्हीके’नं आता दोन्ही प्रकल्पांतून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतलाय. ‘अदानी समूह’ हैदराबादच्या आस्थापनाचा ‘एमआयएएल’मधील सर्व 50.5 टक्के हिस्सा खिशात घालणार असून ‘जीव्हीके ग्रुप’मधील दक्षिण आफ्रिकेच्या दोन कंपन्यांच्या 23.5 टक्के हिश्श्यावर देखील ताबा मिळविण्यास सज्ज झालाय…मुंबईनं प्रवाशांचा विचार केल्यास भारतातील दुसऱया क्रमांकाचा विमानतळ म्हणून मान मिळविलाय…

‘मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा’ला भविष्यात आदेश पाळावे लागतील ते एकूण 74 टक्के हिस्सा विकत घेणाऱया अदानींचे. खेरीज ‘एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एएआय) मुठीत असेल 26 टक्के हिस्सा…‘जीव्हीके ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष जी. व्ही. के. रेड्डी यांनी म्हटलंय, ‘हवाई क्षेत्रावर कोव्हिड-19 मुळं प्रचंड परिणाम झालाय. पुढं पाऊल टाकण्याऐवजी पाळी आलीय ती अनेक वर्षांनी मागं जाण्याची अन् मुंबई विमानतळ सुद्धा त्याला अपवाद नाहीये. ‘एमआयएएल’च्या आर्थिक स्थितीवर ‘विषाणू’चा परिणाम झालाय. त्यामुळं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सावरण्यासाठी गरज होती ती आर्थिकदृष्टय़ा सक्षम गुंतवणूकदाराची. आम्ही वेळ न गमावता गुंतवणूकदाराला शोधण्याचं काम केलंय. खेरीज राष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या ‘नवी मुंबई आंतरराष्ट्री विमानतळ प्रकल्पा’च्या निर्मितीला देखील मदत केलीय. आम्ही अदानींना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय’…
‘अदानी समूहा’नं आता लक्ष केंद्रीत करण्याचं ठरविलंय ते ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पाच्या बांधकामावर…सध्या आर्थिक संकटांना तोंड देणाऱया ‘जीव्हीके ग्रुप’ला गेल्या काही महिन्यांत सामोरं जावं लागलं होतं ते ‘सीबीआय’ नि ‘ईडी’च्या चौकशीला. ‘जीव्हीके’नं ‘एमआयएएल’कडून 705 कोटी रुपये दुसऱया तिजोरीत वळविलेत असा आरोप करणारं निनावी पत्र मिळाल्यानंतर चौकशीला प्रारंभ झाला…गौतम अदानींनी यापूर्वी 50 वर्षांसाठी ‘सर्वांत मोठा बोलीदार’ म्हणून ताबा मिळविलाय तो ‘एएआय’च्या सहा विमानतळांवर. त्यात समावेश जयपूर, गुवाहाटी, थिरुवनंतपूरम (केरळ सरकारचा निर्णयाला विरोध), अहमदाबाद, लखनौ अन् मंगळूर यांचा…‘मुंबई’ आणि ‘नवी मुंबई’ यांना खिशात घालणं शक्य झाल्यामुळं गौतम अदानींना भारतातल्या खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठा ‘एअरपोर्ट डेव्हलपर’ म्हणून मान मिळविलाय. त्यांच्या प्रकल्पांनी 2019-20 आर्थिक वर्षात साडेसात कोटी प्रवाशांना हाताळण्याची कामगिरी बजावलीय…
दिल्ली व हैदराबाद विमानतळांवर ताबा मिळविणाऱया हैदराबादच्याच ‘जीएमआर ग्रुप’नं संपलेल्या आर्थिक वर्षात दर्शन घेतलंय ते 8.5 कोटी प्रवाशांचं…गोव्यातील ‘मोपा ग्रीन फिल्ड’ विमानतळाची निर्मिती ‘जीएमआर समूह’ करतोय. शिवाय दिल्लीच्या ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’नं देशातील सर्वांत जास्त वर्दळ असणारा विमानतळ म्हणून मान मिळविलाय…‘अदानी एंटरप्राइझेस’नं ‘मुंबई शेअर बाजारा’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स’नं ‘जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्स’च्या कर्जाचं अधिग्रहण करण्यासाठी करार केलाय…
15 अब्ज डॉलर्स मूल्याच्या ‘अदानी समूहा’ची अल्पकाळातील ही झेप जबरदस्त यात शंकाच नाही. नरेंद्र मोदी सरकार केंद्रावर सत्तेवर आल्यानंतर 2014 मध्ये ओडिशातील धामरा बंदराच्या अधिग्रहणानं त्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अत्यंत आक्रमक धोरण पत्करत केवळ बंदरंच नव्हे, तर वीज प्रकल्प, विमानतळ या क्षेत्रांमध्ये सुद्धा मुसंडी मारली अन् इतर पायाभूत साधनसुविधा मालमत्ता ताब्यात घेत भारतातील ‘पायाभूत साधनसुविधा क्षेत्रातील सर्वांत मोठा समूह’ बनण्याचा मान केवळ सहा वर्षांत पटकावला…
अलीकडच्या काळात या समूहानं काही बडे पायाभूत साधनसुविधा प्रकल्प आपल्या खात्यात जमा केलेले असून त्यात ताजी भर पडलीय जगातील सर्वांत मोठय़ा सौरउर्जा प्रकल्पाची. त्याची किंमत 6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 45 हजार कोटी रुपये. त्याच्या जोरावर ‘अदानी ग्रुप’ विश्वातील ‘सर्वांत मोठा सौरऊर्जा ऑपरेटर’ बनलाय…गतवषी त्यांनी सर्वांना चकीत केलं होतं ते देशातील सहा विमानतळ विकसित करण्याचं काम आपल्याकडे खेचून घेत. याबाबतीत फारसा अनुभव नसतानाही त्यांनी ‘जीएमआर ग्रुप’, ‘फेअरफॅक्स इंडिया’ सह अनेक मातब्बर नावांवर मात केली…
याभरात समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत देखील कमालीची वृद्धी झालीय आणि 30 मार्च, 2014 मधील 5.1 अब्ज डॉलर्सवरून तिप्पट वाढत 21 सप्टेंबर, 2020 रोजी ती पोहोचलीय 16.7 अब्ज डॉलर्सवर. 2019 मध्ये भाजपाचं सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या एका वर्षात अदानी यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलंय…‘अदानी समूहा’च्या भारतात पाच उपकंपन्या कार्यरत असून मागील महिन्याभरात त्यांच्या ‘शेअर्स’च्या भावातही जोरदार उसळी पाहायला मिळालीय. त्यामागचं कारण दडलंय ते अलीकडच्या काळात लावण्यात आलेला अधिग्रहणांचा सपाटा, व्यवसायात झालेला विकास, निधी उभ्या करण्याच्या योजना आणि दीर्घकालीन विचार करून गुंतवणूकदारांनी टाकलेला विश्वास यामध्ये…या उपकंपन्यांत समावेश आहे तो ‘अदानी एंटरप्राइझेस’, ‘अदानी ग्रीन’, ‘अदानी गॅस’, ‘अदानी पोर्ट्स अँड सेझ’ नि ‘अदानी पॉवर’चा…
गौतम अदानींना इतक्यावरच मर्यादित न राहता पेट्रोलपंपांच्या विभागात देखील शिरण्याचे वेध लागले असून त्यांनी फ्रान्समधील दिग्गज आस्थापन ‘टोटल’समवेत संयुक्त कंपनी निर्माण केलीय. भारतात पेट्रोल पंप खुले करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता ‘टोटल अदानी फ्युअल्स मार्केटिंग’कडून लवकरच अर्ज केला जाईल. जगातील सर्वांत वेगानं वाढणाऱया आपल्याकडील इंधन बाजारपेठेत पाऊल ठेवण्याच्या हेतूनं ‘टोटल’नं गेल्या वर्षी ‘अदानी गॅस’मध्ये 37.4 टक्के हिस्सा खरेदी केला होता !
‘अदानी समूहा’नं केलेली अधिग्रहणं…
| प्रकल्प | रक्कम (कोटी रुपये) |
| धाम्रा बंदर | 5500 |
| कोब्रा वेस्ट पॉवर | 4200 |
| उडुपी पॉवर | 6300 |
| डब्ल्यूआरएसएसएस बी अँड सी ट्रान्समिशन | 1000 |
| कट्टुपल्लकी बंदर | 2000 |
| मुंबई इंटिग्रेटेड पॉवर | 18800 |
| जीएमआर छत्तीसगड एनर्जी | 3530 |
| 205 एमडब्ल्यू सोलर ऍसेट्स | 1300 |
| बिकानेर-खेत्री ट्रान्समिशन | – |
| कृष्णपट्टणम बंदर | 13500 |
| दिघी बंदर | 650 |
| ओरिसा पॉवर जनरेशन | 1020 |
| अलीपूरदुआर ट्रान्समिशन | 1286 |
– राजू प्रभू









